भेटी लागी जीवा : कौंडण्यपुरच्या आई रुख्मिणीची पालखी पंढरीत दाखल
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती/पंढरपूर - आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात महाराष्ट्रातून मानाच्या फक्त दहा पालख्यांनी आज शासकीय बसने पंढरपूरकडे प्रस्थान केले. त्यात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचा समावेश आहे. ही पालखी काल (रविवारी) दुपारच्या सुमारास 40 वारकऱ्यांच्या उपस्थितीत निघाली. सुखरूप प्रवासानंतर आज दुपारच्या सुमारास कौंडण्यपुरच्या आई रुक्मिणीची पालखी पंढरपूरला दाखल झाली आहे. याठिकाणी पंढरपुरात पोहोचणारी ही पहिली पालखी आहे. 17 तास आणि 900 किमीचा प्रवास करुन ही पालखी पंढरपुरात दाखल झाली. पंढरपूरात पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. श्री संत सद्गुरु सदाराम महाराज यांनी इसवी सन १५९४ साली सुरू केलेली व ४२७ वर्षांची परंपरा लाभलेली विदर्भ राजकन्या जगज्जननी तिवसा तालुक्यातील कौंडण्यापूर येथील श्री रुक्मिणी मातेची प्रथम पायदळ असलेली मानाची पालखी आहे. तर उद्या (मंगळवारी) आषाढीला एकादशीला कोंडण्यपूर देवस्थानच्या वतीने पांडुरंगास अहेर करून २१ तारखेला पालखीचा परतीचा प्रवास होणार आहे.