नदीत विद्युत वाहिनीवर अडकले महावितरणाचे कर्मचारी - वैतरणा नदी न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पालघर - वैतरणा नदीला पूर आल्याने ढेकाळे फिडरला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांचे खांब पडले. वैतरणा नदी काठचे खांब पडून नदीच्या प्रवाहात विजवाहिनी तुटून ढेकाळे फिडरचा वीजपुरवठा बुधवारी सायंकाळपासून खंडित झाला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी विद्युत वाहिन्या दुरुस्त करण्यासाठी वीज वाहिन्यांवर गेलेले मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ हे महावितरणाचे दोन कर्मचारी नदी पात्राच्या मध्यात विद्युत वाहिनीवर अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी महावितरणाकडून जिल्हा प्रशासनाला साकडे घालण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन (NDRF) पथक वैतरणा नदी काठावर दाखल झाले. वैतरणा नदीच्या जोरदार प्रवाहात स्पीड बोटीच्या सहाय्याने एनडीआरएफच्या जवानांनी वीज वाहिन्यांवर अडकलेल्या दोन कामगारांना रस्सीच्या सहाय्याने बोटीत उतरवले. त्यानंतर त्यांना नदी किनारी टाकवाहल गावच्या बाजूने बाहेर काढण्यात आले.
Last Updated : Jul 23, 2021, 11:02 PM IST