तब्बल 14 दिवसांनंतर अमरावतीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडली
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - जिल्हा प्रशासनाने शनिवारी जारी केलेल्या आदेशानुसार, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आज सकाळी ७ ते ११ दरम्यान उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वेळेत ग्राहक दुकानात जाऊन खरेदी करू शकतील. मात्र, सोशल डिस्टन्स, मास्क आदी नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. तसेच दुकानदारांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. जिल्हात तब्बल 14 दिवसांपासून भाजीपाला, किराणा, फळ व इतर जीवनावश्यक वस्तूचे दुकाने बंद होते. त्यामुळे पुन्हा 14 दिवसांनी बाजारपेठेत गर्दी पहायला मिळाली आहे. मद्यगृहे, मद्य दुकाने व बार यांना ७ ते ११ या वेळेत केवळ घरपोच सेवा पुरविण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तिथे ग्राहकाला जाऊन खरेदी करता येणार नाही. जिल्ह्यात 9 ते 22 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता, तर अद्यापही जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियम पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आजपासून अमरावती जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल होताच नागरीक घराबाहेर पडले, मात्र राज्यसरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन 1 जून पर्यंत कायम आहे.