Shree Kalaram Rathotsav : श्री काळाराम रथोत्सव, अहिल्याराम आखाडा आणि श्री गरुड रथयात्रेची वर्षानुवर्षांची परंपरा - Shree Garuda Rath Yatra

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 3, 2023, 2:03 PM IST

नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात रामनवमीनंतरच्या एकादशीला श्रीराम रथ आणि गरुड रथयात्रेच्या परंपरा आहे. यानुसार आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काळाराम मंदिर पूर्व येथे मानकरी समीरबुवा पुरी हस्ते पूजनानंतर रथ ओढण्यास प्रारंभ झाला. या रथयात्रेच्या हजारो भाविक सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी रथ मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. श्री काळाराम मंदिरात राम जन्मोत्सवानंतर कामिका एकादशीला रथयात्रा काढण्याची परंपरा पेशवेकाळापासून चालत आली आहे. हा रथोत्सव श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा ते पुन्हा राम मंदिर ते पुन्हा राम मंदिर पूर्व दरवाजा असा असतो. श्री गरुड रथयात्रा निघण्याआधी गरुड रथ ओढणाऱ्या सर्व धुरंधर आणि सेवेकर्यांनी तसेच मंदिराचे पुजारी यांना पश्चिम दरवाजा येथील रविंद्र दीक्षित यांचे निवासस्थानी दुपारी गंध आणि रसपान या करीत आमंत्रित करण्यात येते. त्यानंतर काळारामांच्या भोगमूर्ती आणि पादुका मंदिरातून बाहेर आणून पालखीतून मंदिराची प्रदक्षिणा करतात. मंदिराच्या पूर्व महाद्वारा समोर उत्तुंग दोन लाकडी रथ केळीचे खांब, दिव्याच्या माळा, फुलांनी सजवून सज्ज असतात. भोगमूर्ती रामरथात तर पादुका गरुडरथात विराजमान होतात. आरती होऊन वाद्यांचा गजर होतो आणि रामराया नगर प्रदक्षिणेला निघतात. रास्ते आखाड्याकडून रामरथ आणि श्री अहिल्याराम व्यायामशाळेकडून गरुडरथ नाड्यांनी म्हणजे मजबूत दोरखंडाने ओढले जातात. भक्तांना रामांच्या आगमनाची वार्ता द्यायला गरुडरथ रामरथाच्या पुढे चालतो. रामाकडे तोंड करून रथापुढे उलटे चालणारे सालकरी बुवा प्रतिक्षण श्रीरामप्रभूंचे रूप डोळ्यात साठवत असतात. श्रीराम आणि श्री गरुड रथयात्रा हा नाशिकचा लोकोत्सव आहे. तसेच रामराया आणि नाशिककर यांचे देखील अतूट नाते आहे. अयोध्येचा हा सुकुमार राजकुमार वनवासात गोदातीरी राहायला आला. खरेतर रामाच्या येण्यानेच दंडकारण्य आणि त्रिकंटक असणारी ही भूमी 'जनस्थान' झाली आणि रामांमुळेच हिला नाशिक हे नाव मिळाले. आपल्या प्रिय नाशिककरांना भेटायला साक्षात रामराया वर्षातून एकदा मंदिराबाहेर येतात. रथारूढ होऊन नगरप्रदक्षिणा करतात. म्हणून रामनवमी झाली कि नाशिकला रथयात्रेचे वेध लागतात. यावेळी अवघे नाशिक दर्शनासाठी गोदाकाठी लोटले असते. स्वयंस्फूर्तीने रथयात्रेत सेवा करतात. नाशिकच्या रस्त्यांवरून रामरथ फिरतो तसतसा नाशिककरांच्या धमन्यांमधून रामनाम फिरत असते. गोदावरीच्या अविरत प्रवाहासारखी गोदाकाठची ही परंपरा वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालते आहे. आपल्या काठावरच हे कौतुक गोदामाई प्रतिबिंब म्हणून साठवून ठेवते आहे. श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून निघालेली रथयात्राश्री गरुड रथाचे रामकुंडावर आगमन होते. तिथे वेदमंत्रांच्या घोषात गोदेच्या अमृतजलाने श्रीरामांना अवभृत स्नान घातले जाते. पादुकांना रामकुंडाच्या काठावरून फिरवले जाते. षोडशोपचार पूजन आणि आरती होऊन सुमारे दोन तासांच्या पूजेनंतर दोन्ही रथांचा परतीचा प्रवास सुरू होतो. नगरप्रदक्षिणा करून रामराय मंदिराच्या पूर्वद्वारी येतात.औक्षण स्वीकारून पालखीने मंदिरात जातात.भक्तांसाठी बाहेर आलेले देव गर्भगृहात पुन्हा विराजमान होतात. आरती होते आणि या भक्ती सोहळ्याची सांगता होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.