Bus Stuck In Water: साचलेल्या पाण्यात खासगी बस अडकली; २० ते २५ प्रवाशांची सुखरूप सुटका - Private bus stuck in stagnant water
🎬 Watch Now: Feature Video
पालघर (वसई) : वसई पश्चिम येथील सनसिटी परिसरात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास पावसामुळे साचलेल्या पाण्यात खासगी बस बंद पडल्याने २० ते २५ प्रवासी अडकून पडले होते. या प्रवाशांची वसई विरार नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरूप सुटका केली आहे. मागील दोन दिवसांपासून वसई विरार शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वसई विरारमधील मुख्य रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. त्यात वसई पश्चिमेच्या भागात असलेला सनसिटी रस्ताही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या रस्त्यावरून गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मोठ्या खासगी बसमधून काही प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, साचलेल्या पाण्यात ही बस अचानकपणे बंद पडली. त्यामुळे यात बसलेल्या प्रवाशांची कोंडी झाली होती. याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांना सुरक्षा जॅकेट व लाईफ रिंगच्या साहाय्याने हळूहळू बाहेर काढण्यात आले आहे. सुमारे २० ते २५ नागरिकांची या बंद पडलेल्या बसमधून सुटका केली गेली. बसचे सेन्सर लॉक झाल्याने बस अद्यापही बंद पडून आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. ही कामगिरी सनसिटी, श्रीप्रस्था व आचोळे या अग्निशमन केंद्राच्या जवानांनी केली आहे.