Heavy Rain In Maharashtra: राज्यात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : भारतीय हवामान विभागानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः 7 जूनच्या दरम्यान होते. पण यंदाच्या वर्षी 11 जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. तसेच राज्यात 24 जून पासून बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली आहे. जून महिन्यात सरासरी पर्जन्यमान हे 207.6 मिमी असून प्रत्यक्षात यंदाच्या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस 110.9 मिमी पाऊस पडलेला आहे. हवामान विभागाच्या वतीने पुढील आठवडाभर राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, गोवा याठिकाणी येत्या 4 जुलै पर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच किनारपट्टीवर सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शिल्पा आपटे यांनी यावेळी दिली. येत्या आठवड्यात पुण्यात देखील आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.