PM Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार दगडूशेठ गणपतीचे दर्शन; प्रशासनाकडून तयारी सुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे: येत्या 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला सुरुवात पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती पासून होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंदिर प्रशासनाकडून पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील पोलिसांकडून मंदिराची पाहणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती आणि अभिषेक करण्यात येईल. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती दगडूशेठ गणपती ट्रस्टचे हेमंत रासने यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारकचा 'लोकमान्य टिळक पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्याचबरोबर बालेवाडी येथे सुद्धा त्यांचा एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार असल्याचे माहिती समोर आलेली आहे. त्या संदर्भात मंदिराकडूनसुद्धा तयारी करण्यात येत आहे.
दगडूशेठ गणपती मंदिरात नेहमी सुरक्षा असते आणि हे संवेदनशील ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी हायअलर्टसुद्धा असतो. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे आणखी खबरदारी सुरक्षा यंत्रणांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सुरक्षा यंत्रणा सुद्धा आतापासूनच आढावा घेत असून आणि पुरेशी तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती दगडूशेठ गणपती ट्रस्टचे पदाधिकारी हेमंत रासने यांनी दिली आहे.