देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, घुगे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी पाहा व्हिडिओ - कार्तिकी एकादशीचा सोहळा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 23, 2023, 7:38 AM IST
|Updated : Nov 23, 2023, 1:49 PM IST
पंढरपूर Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीचा सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंढरीत सुरू झालाय. परंपरेनुसार आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून दर्शन रांगेतील भाविकांची निवड होत असते. त्यांना शासकीय महापुजेचा वारकरी प्रतिनिधी म्हणून मान मिळत असतो. यंदा या शासकीय महापुजेचा मान नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन विठोबा घुगे व वत्सला बबन घुगे या वारकरी दांपत्याला मिळालाय. हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहे. या मानाच्या वारकऱ्यांना वर्षभर मोफत एस टी महामंडळाचा पास मिळणार आहे. महापुजेनंतर यबोलताना फडणवीस म्हणाले, भागवत धर्माची पताका पिढ्यानुपिढ्या वारकरी संप्रदाय पुढं घेऊन जातोय. कितीही आक्रमणं झाली, संकटं आली तरी हा वारकरी संप्रदाय कधीही थांबला नाही. त्यांच्या पावलांनी नेहमीच पंढरीची वाट धरली. महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला असून महाराष्ट्र धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिला. तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. सर्व संतांनी त्यांच्या विचार व आचरणातून सामान्य माणसाला असामान्य बनवलं. अनेक पिढ्या बदलल्या आहेत. परंतु भागवत संप्रदायावरील लोकांची श्रद्धा बदलली नाही, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी कार्तिकी एकादशी निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.