Heavy Rains In Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी सायंकाळी 23 मार्ग बंद झाले होते. जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट नुसार जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी आज 22 जुलै रोजी शाळा-महाविद्यालयांना सुटीची अधिसूचना जारी केली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या भात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. काल २१ जुलै रोजी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार माजला होता. दक्षिण गडचिरोली भागातील सिरोंचा महामार्ग व अहेरी-भामरागड मार्ग बंद होते. आलापल्ली शहरात मुख्यमार्गावरील दुकानात पाणी शिरले होते. शेतात भात रोवणीसाठी गेलेल्या अनेक महिलांना गावकऱ्यांच्या सहकार्याने पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आल्याची घटना शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील कर्कापल्ली परिसरात घडली. सकाळी कर्कापल्ली गावातील अनेक महिला शेतात भात रोवणीसाठी गेल्या होत्या. मात्र, सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्याने सायंकाळी पुराने वेढा घातला. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने महिलांना बाहेर पडणे धोक्याचे झाले होते. परंतु, गावकऱ्यांच्या सहकार्याने सर्व महिलांना हातात हात धरून सुखरूप बाहेर काढण्यात आले.