Thane News: उन्हाळ्यात खात संत्री, हरवले आहेत आमचे पालकमंत्री; शिंदे गटाला बॅनरबाजीतून टोमणा - Eating Oranges In Summer
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : राज्याच्या ठाकरे आणि शिंदे गटातील सत्ता संघर्षाला १० महिने उलटून गेले. तरीही विशेतः ठाणे जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून ते वरिष्ठ नेत्यापर्यंत एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्याची जणू स्पर्धा लागल्याचे, मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यातच शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतर काही महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली.
हरविल्याचे लावले बॅनर : विशेतः मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे जिल्हाचे पालकमंत्री पद साताऱ्याचे शंभूराजे देसाई यांना देण्यात आले. मात्र ते पालकमंत्री झाल्यापासून आज तागायत कल्याण डोंबिवलीत आलेच नसल्याचे ठाकरे गटाने त्यांच्या नावाने हरवल्याचे बॅनर लावत टोमणा लगावला. कल्याणमध्ये लावण्यात येणाऱ्या बॅनरवर 'उन्हाळ्यात खात संत्री, हरवले आहेत आमचे पालकमंत्री' असे बॅनर लावले, मात्र बाजरपेठ पोलिसांनी बॅनर ताब्यात घेतल्याने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना सहसंघटक रुपेश भोईर यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला.
बॅनर घेतले ताब्यात : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई कल्याण डोंबिवलीकरांना भेट द्या, इथे खूप समस्या आहेत. पालकमंत्री हरवले आहेत अशा आशयाचे बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात लावायला घेतले होते. मात्र हे बॅनर लावण्याची तयारी सुरू असतानाच पोलीस त्या ठिकाणी पोहचले, त्यांनी हे बॅनर ताब्यात घेतले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यात राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.