अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं 'दिवाळं'; हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) Unseasonal Rain : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा व अवकाळी पाऊस बरसल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. रविवारी सायंकाळी गंगापूर तालुक्यात सुरु झालेल्या अवकाळी पावसानं वेचणीस आलेला कापसाच्या वाती झाल्या असून, काढणीस आलेली ज्वारीची पिकंही भुईसपाट झाली आहे. तसंच ढगाळ वातावरणानं अवकाळी पावसानं कांदा, गहू, मका, हरबरा पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळं पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यानं गंगापूर तालुक्यातील नरसापुर, सारंगपूर, दहेगाव बंगला, मुरमी परिसरात हुरडा उत्पादक शेतकऱ्यांचंही अत्यंत नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, बाजरीचा चारा जनावरांसाठी ठेवला होता. मात्र, रविवारी सायंकाळी आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसानं हा चाराही खराब होऊन जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळं अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडलीय.