kalyan local Train : ... अन् प्रसंगावधान राखत मोटरमनने लोकल ट्रेन थांबवली - life of a Man sitting on the Railway Track
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : एक मद्यपी माथेफिरू तरुणाने थेट रेल्वे रुळाच्या मध्यभागी ठाण मांडले होते. सुदैवाने लोकल ट्रेनच्या मोटरमनचे लक्ष गेल्यामुळे प्रसंगावधान राखत मोटरमनने लोकल ट्रेन थांबवली. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकाजवळ घडली होती. या घटनेचा व्हिडिओ दोन दिवसापासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर एकहून सीएसटीएमच्या दिशेने सोमवारी सकाळी पावणेनऊ वाजल्याच्या सुमारास लोकल निघाली होती. तोच कल्याण रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे रुळाच्या मध्यभागी एक तरुण ठाण मांडून बसल्याचे लोकलच्या मोटरमनच्या लक्षात आले. एकीकडे प्रसंगावधान राखत मोटरमनने लोकल ट्रेन थांबवली. तसेच आरपीएफला पाचारण केले. तर दुसरीकडे या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण मोटरमनच्या कॅबिनमधून काढण्यात आले. दरम्यान, आरपीएफ पथकाने या तरुणाला ताब्यात घेतले. मद्यप्राशन केलेला हा तरुण आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर बसला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांना या घटनेबाबत विचारले असता, तो तरुण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात नाही. तसेच तो तरुण का आत्महत्या करत होता याची माहिती मिळाली नाही. मोटरमन यांनी परस्पर त्या तरुणाला आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या हवाली केले. त्यामुळे या तरुणाच्या कृत्याबाबत लोहमार्ग पोलिसांसह आरपीएफ पोलिसांकडे कोणतीही नोंद नाही. सदर तरुणाचा शोध घेतला असता तो मिळून आला नसल्याचे, लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले.