हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट; राज्यात सकाळपासून पावसाची हजेरी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईत रात्री 8 ते सकाळी 8 या 12 तासात शहर विभागात 47.69 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 67.35 मिमी तर पूर्व उपनगरात 69.48 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने बुधवारी रेड अलर्ट दिला होता. गुरुवार ते रविवार या चार दिवसात ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रात आज दुपारी 12.54 वाजता 4.32 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.