अगदी आतापर्यंत पुरुष वंध्यत्व ही कल्पना जणू काही परग्रहावरची आहे असे समजत असत. अनेक कारणांमुळे समाज पुरुषांमध्ये वंध्यत्व असणे ही सर्वसाधारण वैद्यकीय स्थिती आहे, हेच स्वीकारायला तयार नाहीत. पण यावर फक्त चर्चा नको तर लोकांना याबद्दल शिक्षणही दिले गेले पाहिजे. म्हणजे मूल होत नसेल तर फक्त स्त्रीला जबाबदार धरले जाणार नाही. शिवाय ज्या पुरुषामध्ये वंध्यत्व असेल तर त्याला वेळेवर उपचार मिळतील.
डॉ. राहुल रेड्डी सांगतात, लोकांना वाटते की हल्ली कुटुंबे पूर्वीच्या तुलनेत जास्त जागरुक झालेली आहेत. पण खरे सांगायचे तर परिस्थिती फार काही बदललेली नाही. ते सांगतात, शहरातले लोक या स्थितीचा लगेच स्वीकार करतात आणि वैद्यकीय मदत घ्यायला संकोच करत नाहीत. पण याचे प्रमाण खूप कमी आहे.
पुरुष वंधत्वाच्या मुख्य कारणाला वैद्यकीय भाषेत अझोस्पर्मिया म्हणतात. यात शुक्राणूंची संख्या शून्य असते. डॉ. राहुल रेड्डी सांगतात, यामुळे वीर्यात शुक्राणू अजिबातच नसतात.
अझोस्पर्मियाचे प्रकार
डॉक्टर सांगतात की दोन प्रकारचे अझोस्पर्मिया असतात. अडथळा आणणारे आणि अडथळा न आणणारे.
अडथळा आणणारे – यात उत्पादक शुक्राणू असतात. पण ब्लाॅकेजेस असतात किंवा वृषणात जाणारी नस नसते. याचा अर्थ शुक्राणूंना बाहेर पडायचा रस्ताच मिळत नाही. त्यामुळे ते वीर्यात जाऊ पोहचू नाहीत.
अडथळा न आणणारे – काही कारणाने शुक्राणूंची संख्या खूपच कमी असते किंवा अजिबातच नसते. डॉ. रेड्डी सांगतात या दोन्ही प्रकारांमध्ये परिस्थिती जास्त बिघडू नये म्हणून ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्यायला हवी.
ते सांगतात, एरवी शरीराच्या ज्या अवयवात काही दुखणी असतात, त्या भागात वेदना होतात. पण या स्थितीत पुरुषांना सुरुवातीच्या काळात काहीच जाणवत नाही. म्हणून त्यांनी पुरुषांना सल्ला दिला आहे की लग्नाआधी प्रत्येकाने आपली तपासणी करावी.
अझोस्पर्मियाची कारणे
अझोस्पर्मियामागे अनेक कारणे असू शकतात. जीवनशैलीही याला जबाबदार आहे. अनेकदा अनुवांशिक अकार्यक्षमता पुढच्या पिढीतही जाते आणि यामुळे अझोस्पर्मिया होऊ शकतो.
काही कारणे पुढीलप्रमाणे :
- अति अल्कोहोल, तंबाखू किंवा ड्रग्जचे सेवन
- अगोदर झालेला जंतूसंसर्ग
- ओटीपोटीभोवती केलेली शस्त्रक्रिया
- प्रजोत्पादनासाठी अक्षम करणारी शस्त्रक्रिया
- गळू होणे
- हार्मोन्सचे असंतुलन
- रेडिएशन उपचार किंवा केमोथेरपी
इतरही काही कारणे आहेत, मुख्यत्वे अनुवांशिक. पण त्यावर उपचार होऊ शकतो. तुम्ही प्रदूषित वातावरणात जास्त राहिलात तरीही अझोस्पर्मिया होऊ शकतो.
अझोस्पर्मियाची लक्षणे
अझोस्पर्मिया असेल तर काही गोष्टींचा सामना करावाच लागतो. पुढील लक्षणे दिसली तर तुम्ही लगेच डॉक्टरांची मदत घ्या.
- वीर्याचे प्रमाण कमी होणे
- ताठरता न येणे
- सेक्सची इच्छा कमी होणे
- सतत थकवा येणे