दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात नेत्रदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि मृत्यूनंतर लोकांनी नेत्रदान करावे याचे प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मोतिबिंदू आणि काचबिंदूनंतर कॉर्नियाला (डोळ्याच्या पुढील भागाला कॉर्निया म्हणतात, त्याच्या पेशींना दुखापत होते) झालेल्या दुखापतीमुळे जास्त करून अंधत्व येते.
नॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडिया (एनएचपी) च्या मते, लोक नेत्रदानासाठी पुढे येत नाहीत, त्यामागे बरीच कारणे आहेत आणि याबद्दल लोकांमध्ये जागरुकताही नाही. त्यापैकी काही कारणे अशी –
- संस्था आणि रुग्णालयांत सोयींचा अभाव
- प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमध्येही प्रेरणा नसणे
- सामाजिक आणि धार्मिक भ्रामक समजुती
अशाच काही सर्वसाधारण भ्रामक समजुती –
1. मला दृष्टिदोष आहे म्हणून मी नेत्रदान करू शकत नाही.
तुम्हाला दृष्टिदोष असेल तरीही सुदैवाने तुम्ही नेत्रदान करू शकता. जे लोक जवळचा किंवा दूरचा चष्मा लावतात किंवा लेन्सेस घालतात, ते नेत्रदान करू शकतात. कुठल्याही वयाची व्यक्ती, कुठल्याही रक्तगटाची व्यक्ती, स्त्री – पुरुष कुणीही नेत्रदान करू शकतात.
2. मी पुढच्या जन्मी अंध होईन
नाही. ही अंधश्रद्धा आहे. नेत्रदान करणे किंवा अवयव दान करणे हा मोठा दानशूरपणा आहे. शिवाय पुनर्जन्म असलाच तर तुमचा आत्मा नव्या शरीरात प्रवेश करतो आणि अशा कमतरता तो पुढे नेत नाही.
3. नेत्रदानामुळे माझा चेहरा बिघडेल
असे अजिबातच होणार नाही. यात कॉर्निया काढला जातो आणि पूर्ण डोळा नाही. काही वेळा त्या जागी कृत्रिम डोळा बसवला जातो. त्या जागी काही भोक राहात नाही.
4. मी प्रतिज्ञापत्र केले नाही तर नेत्रदान करू शकणार नाही.
हेही चुकीचे आहे. एखाद्याने जिवंतपणी तसे सांगितले नसले तरीही त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातले लोक निर्णय घेऊ शकतात.
5. डॉक्टर माझे आयुष्य वाचवण्याचा प्रयत्न करणार नाहीत.
काहीही झाले तरी कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर रुग्णाचे आयुष्य वाचवण्याची खटाटोप करत असतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतरच नेत्रदान करता येते.
6. व्यक्तीच्या कुटुंबाला पैसे द्यावे लागतात.
हा पण एक गैरसमज आहे. रुग्णाने नेत्रदान करण्यासाठी पैसे पडत नाही. हे सेवाभावी कार्य आहे.
7. मी नेत्रदान केले तर डॉक्टरांना पैसे मिळतात.
अजिबात नाही. एखाद्या व्यक्तीचे डोळे किंवा इतर अवयव विकणे किंवा विकत घेणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नेत्रदानाला पैसे पडत नाहीत.
8. नेत्रदान हे वेळखाऊ आहे.
नाही. रुग्णाच्या मृत्यूनंतर संबंधित अधिकाऱ्यांना कळवले की प्रक्रिया १५ – २० मिनिटात पूर्ण होते.
जेव्हा तुम्ही हे जग बघू शकणार नाही, तेव्हा अजून कुणी तरी हे जग बघायला सक्षम होईल. मृत्यूनंतरचे सेवाभावी कार्य म्हणून तुम्ही नेत्रदान करू शकता आणि प्रत्येकानेच नेत्रदान करायला पाहिजे.