हैदराबाद - मेंदू हा आपल्या शरीराचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे. आपल्या पूर्ण शरीरावर मेंदूचे नियंत्रण असते. त्यामुळेच मेंदूवर झालेल्या आघाताचा परिणाम सगळ्या शरीरावर होतो. मेंदूशी संबंधित समस्यांचा एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम होतो.
मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे पुरुष नपुंसक होऊ शकतो आणि त्यांना त्यांची शारीरिक किंवा लैंगिक गरज काय आहे, हे कळण्यास अडचण येऊ शकते. याबाबत आम्ही हैदराबादच्या कन्सल्टंट मायक्रोसर्जिकल अँड्रोलॉजिस्ट डॉ. राहुल रेड्डी यांच्याकडून अधिक माहिती घेतली. ‘गंभीर अपघात किंवा आजारामुळे मेंदूवर झालेला परिणाम व्यक्तीच्या क्रिया आणि प्रतिक्रियांवर प्रभाव टाकतात. ठराविक संसर्ग किंवा हायपरटेंशनमुळे मेंदूवर परिणाम होतात. अपघातामुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. याला 'सेरेब्रोवैस्कुलर' म्हणून ओळखले जाते आणि आपल्या शरीरावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
पुरुषाला मेंदूच्या ज्या भागातून उत्तेजना मिळते, त्याच भागात दुखापत झाली तर तो आपल्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवू शकत नाही किंवा त्याला तशी इच्छा तयार होत नाही. अशा स्थितीतून बरे होणे हे कठीण असते. जर एखादी व्यक्ती ४० वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर परिस्थिती आणखी त्रासदायक असू शकते. कारण तरुण वयात सेक्स करणे अशक्य होत असेल तर त्याचा परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो, असे डॉ. रेड्डी म्हणाले.
मेंदूला झालेल्या दुखापतीचा परिणाम लैंगिक आरोग्यावर कसा होतो?
लैंगिक वर्तनात बदल - मेंदूच्या ज्या भागात प्रेम, शारीरिक संबंध आणि सेक्सची उत्तेजना असते, तोच भाग दुखावला गेला तर रुग्णाची सेक्सची इच्छा कमी होते.
नपुंसकत्व आणि ऑरगॅझमचा अभाव - मेंदूवर झालेल्या आघातामुळे तात्पुरते किंवा कायमचे नपुंसकत्व येते. शिवाय स्त्री आणि पुरुषाला ऑरगॅझमपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. प्रसंगी औदासिन्य, तणाव आणि वैयक्तिक संबंधातील समस्यांमुळे संभोगातील सातत्यही कमी होते.
मेंदूवर आघात आणि शारीरिक समस्या - मेंदूला मार लागल्याने लैंगिक संबंध, उत्तेजना यावर परिणाम होत असेल तर व्यक्तीला शारीरिक संबंध ठेवतानाही अडचणी येऊ शकतात. अगदी शारीरिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीलाही लैंगिक संबंध ठेवताना औदासिन्य येऊ शकते.
भावनिक परिणाम - तणाव, अस्वस्थता आणि डिप्रेशन या मानसिक आजारांमुळेही लैंगिक संबंधातील रस कमी होतो.
औषधांचा वापर - मेंदूच्या आजारावर अनेक औषधे दिली जातात. त्यामुळे शारीरिक उत्तेजना कमी होते.
इतर शारीरिक दुखापत - अपघातात मेंदूशिवाय लैंगिक क्रिया करणारे इतर अवयव दुखावले गेले असतील तर मग तुमच्या सेक्स लाईफवर नक्कीच परिणाम होऊ शकतो.
इतर आजार - मेंदूला दुखापत झालेल्या व्यक्तीमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब हे रोग असतील तर मग अडचणींत भरच पडू शकते.
डॉ. रेड्डी हे स्पष्ट करतात की, मेंदूवर आघात किंवा मेंदूला इजा होणे ही एक गंभीर समस्या आहे. म्हणूनच अशा रुग्णांची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारण यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यांच्याशी बोलणे आणि त्यांच्या समस्या समजून घेणे आवश्यक आहे. मेंदूवरचा आघात बरा होऊ शकतो मात्र, त्यामुळे लैंगिक आरोग्यावर झालेले दुष्परिणाम बरे करणे इतके सोपे नाही. म्हणूनच, तज्ज्ञांकडून नियमित सल्ला घेणे आणि त्यांच्या निर्देशानुसार योग्य खबरदारी व औषधे घेणे आवश्यक आहे.