हैदराबाद : मासिक पाळी हा महिलांच्या प्रजनन आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. मासिक पाळीच्या काळात दर महिन्याला अनेक महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कमी तर कधी जास्त त्रास असू शकतो. मात्र बहुतांश महिला या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. महिलांनी आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. मासिक पाळीच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
मासिक पाळीत येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये : स्त्री असणे हे महिलांसाठी सौभाग्याचा उत्सव असतो. प्रत्येक स्त्री आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व समस्यांना तोंड देत संसाराची सगळी जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने संभाळते. बालिका ते तरुणी, तरुणीकडून आई आणि आई ते आजी हा प्रवास काही सोपा नसतो. या प्रवासात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे त्यांना अनेकदा शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.
जबाबदाऱ्या सांभाळताना आरोग्याकडे दुर्लक्ष : वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मासिक पाळीमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यासह शरीरातील हार्मोनल बदलामुळे येणाऱ्या समस्या संभाळत स्त्रिया आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात. मात्र कधी कधी जबाबदाऱ्या संभाळताना महिला आपल्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतात. सर्दी, ताप किंवा सर्दी सारख्या समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या, परंतु जेव्हा मासिक पाळी, प्रजनन अवयवांमध्ये संसर्ग किंवा त्यांच्याशी संबंधित काही समस्या येतात, तेव्हा आजही बहुतेक महिला त्याकडे दुर्लक्ष करतात.
मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया : मासिक पाळी ही महिलांमध्ये नियमित प्रक्रिया आहे. या काळात बहुतेक महिलांना ओटीपोटात दुखण्यासह इतरही समस्यांना सामोरे जावे लागते. पण या समस्यांमुळे त्यांच्या आरोग्यावर आणि दिनचर्येवर परिणाम झाला तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये असा सल्ला तज्ज्ञ देतात. मासिक पाळी का आवश्यक असते, आणि मासिक पाळीतील समस्या कधी गंभीर होऊ शकतात, हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारत सुखीभावाने उत्तराखंडमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विजयालक्ष्मी यांच्याकडून विविध माहिती घेतली. ही माहिती खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.
मासिक पाळी का आहे महत्वाची : स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विजयालक्ष्मी यानी मासिक पाळी ही बहुतांश स्त्रियांसाठी सुरळीत आणि सोपी प्रक्रिया नसल्याचे स्पष्ट केले. काही स्त्रियांना 4 ते 5 दिवस सतत रक्तस्त्राव होतो. त्यासह ओटीपोटात दुखते त्यासह काहीवेळा इतर समस्यांमुळे हा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण असतो. जर रक्तस्त्राव जास्त होत असेल तर मासिक पाळीचे दिवस अधिक वेदनादायक बनू शकतात. मासिक पाळीची ही प्रक्रिया स्त्रियांच्या प्रजनन व्यवस्थेची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे आरोग्यासाठी मासिक पाळी खूप महत्त्वाची आहे. या प्रक्रियेदरम्यान स्त्रियांच्या शरीरात वाढते निर्माण होणाऱ्या हार्मोन्समुळे त्यांचे शरीर गर्भधारणेसाठी तयार होण्यास मदत होते. स्त्रीला मासिक पाळी येत नसली तरी ही मोठी समस्या असते. कारण त्यामुळे गर्भधारणेत समस्या निर्माण होऊ शकतात.
रजोनिवृत्तीपर्यंत चालू असते मासिक पाळी : मुलीचा जन्म झाल्यानंतर साधारणत: 12 किंवा 13 व्या वर्षी मासिक पाळी सुरू होते. काही मुली किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळी ३ ते ५ दिवस असते. मात्र काही मुलींना २ ते ७ दिवस मासिक पाळी असते. मासिक पाळीचे हे चक्र स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती होईपर्यंत चालू असते. परंतु सामान्य स्थितीत स्त्रीच्या गर्भधारणेदरम्यान हे चक्र थांबते. बाळाच्या जन्मानंतर हे चक्र पुन्हा सुरू होते. स्त्रियांना रजोनिवृत्ती सहसा 45 ते 50 वयोगटातील महिलांमध्ये होते. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये प्रजनन चक्र थांबते. यानंतर महिलेला गर्भधारणा होऊ शकत नसल्याचेही स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विजयालक्ष्मी यांनी स्पष्ट केले.
मासिक पाळी न येणे ही देखील मोठी समस्या : काही महिलांमध्ये मासिक पाळी न येणे ही देखील मोठी समस्या मानली जाते असेही डॉ. विजयालक्ष्मी यांनी यावेळी स्पष्ट केले. मासिक पाळी न येणे याला अमेनोरिया असे म्हणतात. त्यात दोन प्रकार असल्याचेही डॉ विजयालक्ष्मी यांनी स्पष्ट केले. यातील पहिला प्रकार म्हणजे प्राथमिक अमेनोरिया असे म्हटले जाते. यामध्ये मुलींना वयाच्या १५ किंवा १६ व्या वर्षीही मासिक पाळी येत नाही. तर दुसरा दुय्यम अमेनोरिया होय. यात आरोग्य किंवा इतर कारणांमुळे नियमित मासिक पाळी अचानक येणे बंद होते असेही डॉ विजयालक्ष्मी यांनी स्पष्ट केले.
थायरॉईड ठरू शकते कारणीभूत : प्राथमिक अमेनोरियात गुणसूत्रांमधील असामान्यता किंवा गडबड, अंडाशयातील समस्या, किंवा थायरॉईड कारणीभूत ठरू शकते. याचा स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचेही डॉ विजयालक्ष्मी यांनी स्पष्ट केले. तर दुय्यम अमेनोरियामध्ये गर्भधारणेमुळे, गर्भाशयात फायब्रॉइड्स, पीसीओडी आणि इतर प्रकारच्या कारणांमुळे आणि रजोनिवृत्तीमुळे मासिक पाळी कायमची किंवा तात्पुरती थांबत असल्याचे मतही डॉ विजयालक्ष्मी यांनी यावेळी व्यक्त केले. मात्र रजोनिवृत्तीची स्थिती सोडल्यास इतर कारणांमुळे मासिक पाळी पुन्हा सुरू होऊ शकते. प्रसूतीच्या काही काळानंतर मासिक पाळी स्वतःहून सुरू होते. तर रोगामुळे किंवा कोणत्याही समस्येमुळे मासिक पाळी थांबण्याची समस्या योग्य उपचारानंतर बरी होऊ शकत असल्याचेही त्या म्हणाल्या.
मासिक पाळी दरम्यान समस्या : बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी पोटदुखी, जडपणा, पोटात गॅस, पोट फुगणे किंवा रक्तस्त्रावासारख्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ विजयालक्ष्मी यांनी स्पष्ट केले. काही स्त्रियांमध्ये रक्तस्त्राव खूपच कमी किंवा सहन करण्यायोग्य स्थितीत असते तर काहींमध्ये स्त्रीच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम करणारे ठरते. बहुतेक स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान होणार्या वेदना किंवा समस्यांना मासिक पाळीची दिनचर्या मानून दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मासिक पाळी दरम्यान वेदनांसाठी गर्भाशयाचे आकुंचन होणे जबाबदार असते. गर्भाशयात कमी-अधिक प्रमाणात आकुंचन कमी-जास्त प्रमाणात दुखणे यासाठी जबाबदार असते. प्रोस्टॅग्लॅंडिन नावाचा हार्मोन गर्भाशयाच्या आकुंचनासाठी जबाबदार आहे, असे मानले जाते. योग्य पचनसंस्थेसाठी देखील आवश्यक आहे. अशा परिस्थितीत या संप्रेरकाची निर्मिती किंवा सक्रियता केवळ गर्भाशयाच्या आकुंचनच्या गतीवर परिणाम करू शकत नाही. तर मासिक पाळीच्या वेळी पोटदुखी सारख्या समस्या देखील होऊ शकतात. काहीवेळा प्रजनन अवयवांमध्ये फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस, पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज, एडेनोमोसिस आणि सर्व्हायकल स्टेनोसिस इत्यादी कारणांमुळे ओटीपोटात तीव्र वेदना होतात. त्यासह मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव देखील होऊ शकतो असेही डॉ विजयालक्ष्मी यांनी स्पष्ट केले.
काय घ्यावी काळजी : सगळ्याच महिला मासिक पाळीच्या काळात आवश्यक स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. स्वच्छतेचा अर्थ फक्त सॅनिटरी नॅपकिन्स वापरणे असा नाही, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यापेक्षा त्यांचा योग्य वापर करणे, वारंवार बदलणे, या काळात योनीमार्ग स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणे, दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुणे, स्वच्छ अंतर्वस्त्रे परिधान करणे हे देखील स्वच्छता राखण्यासाठी खूप महत्वाचे असल्याचे डॉ विजयालक्ष्मी यांनी यावेळी सांगितले. या काळात कापड वापरणाऱ्या महिलांनी वापरलेले कापड नेहमी स्वच्छ असावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात रक्तस्त्राव जास्त होत असेल किंवा वेदना खूप होत असतील, तरीही डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात. हे केवळ वृद्ध किंवा ग्रामीण भागातील महिलाच करतात असे नाही, तर शहरी महिलांमध्येही हा कल दिसून येत असल्याचेही डॉ विजयालक्ष्मी यांनी यावेळी सांगितले. मासिक पाळी ही एक सामान्य स्थिती आहे. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. जर मासिक पाळीत त्रास होत असेल तर लगेच स्त्रीरोग तज्ज्ञांशी संपर्क करणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा संसर्गावर योग्य वेळी उपचार न केल्यास समस्या गंभीर होऊ शकते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - Rare Disease Day 2023 : देशातील ७० दशलक्ष नागरिकांना ग्रासले दुर्मीळ आजारांनी, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी