हैदराबाद : देशभरात सध्या एच३एन२ इन्फ्लूएंझाच्या रुग्णांची प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एच३एन२ या आजारामुळे चांगलीच दहशत पसरली आहे. या आजारावर उपचार उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आल्याने नागरिकांची जास्तच तारांबळ उडाली आहे. मात्र एच३एन२ या आजाराने घाबरुन जाण्याचे कारण नाही. योग्य काळजी घेतली, तर या आजाराला दूर ठेवता येते. त्याच्यावर योग्य उपचारही केले जाऊ शकतात. त्यामुळे या विषाणूपासून घाबरून जाण्याची गरज नाही, तर त्याचा प्रसार रोखण्यासाठी आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे.
सुरक्षित नियमांचे करा पालन : एच३एन२ इन्फ्लूएंझाच्या विषाणूचा अनेक राज्यांमध्ये संसर्ग झाला आहे. त्यासह काही मृत्यूही या विषाणूमुळे झाले आहेत. मात्र या काळात फ्लू आणि संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. हवामानात सातत्याने बदल होत असल्याने फ्लू संसर्ग, इतर व्हायरल इन्फेक्शन, डोळ्यांचे संक्रमण आणि पाचन समस्यांना नागरिक बळी पडतात. परंतु यावेळी हवामानातील सततच्या बदलामुळे हंगामी समस्या आणि संसर्गाने त्रस्त नागरिकांची संख्या अधिक वाढत आहे.
प्रसार रोखण्यासाठी घ्या काळजी : H3N2 इन्फ्लूएंझा, कोरोना आणि सामान्य व्हायरल इन्फेक्शनची लक्षणे सामान्यतः सारखीच असतात. त्यामुळे H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसची वाढती प्रकरणे आणि नागरिकांमध्ये सामान्य व्हायरल किंवा फ्लूची वाढती प्रकरणे, या दोन्हीतील समान लक्षणांमुळे लोकांमध्ये चिंता आणि गोंधळ निर्माण झाला आहे. परंतु संसर्गाचा प्रकार कोणताही असो, त्याची सुरुवातीची लक्षणे समजून घेतली पाहिजे. त्यासह योग्य वेळी वैद्यकीय मदत घेऊन त्यांचा प्रसार रोखण्यासाठी नमूद केलेल्या सर्व सुरक्षिततेच्या खबरदारीचा अवलंब केल्यास या विषाणूला आळा घालता येतो.
काय आहे H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस : इन्फ्लूएंझा विषाणू पहिल्यांदाच आपला संसर्ग पसरवत नाही. भूतकाळात देखील इन्फ्लूएंझा आणि त्याच्या अनेक उपप्रकारांमुळे मानवांमध्ये आणि प्राण्यांमध्ये हा संसर्ग पसरल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु सध्या पसरत असलेला विषाणू H3N2 हा 'इन्फ्लुएंझा ए'चा उपप्रकार मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूमुळे मानवांमध्ये श्वसन संक्रमण होते. हा एक अतिशय सांसर्गिक विषाणू असून तो वेगाने पसरतो.
काय आहेत H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसची लक्षणे : एखाद्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला हा संसर्ग होऊ शकतो. बाधित व्यक्तीच्या शिंकण्यातून, खोकल्यातून, हा संसर्ग होऊ शकतो. बाधित व्यक्तीने स्पर्श केल्याने, न धुतलेल्या हातांनी तोंड किंवा नाकाला स्पर्श केल्याने किंवा काहीही खाल्ल्याने हा संसर्ग पसरू शकतो. या विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गामध्ये रुग्णाला सुरुवातीला 2-3 दिवस खूप ताप असतो. याशिवाय शरीर दुखणे, डोकेदुखी, थरथर कापणे, नाक वाहणे, शिंका येणे, मळमळ-उलट्या होणे, घसा दुखणे-जळजळ होणे, स्नायू आणि शरीर दुखणे, काही प्रकरणांमध्ये जुलाब आणि खोकला आदी लक्षणे दिसून येतात. त्यासह सौम्य किंवा तीव्र सर्दी, खोकला आणि ताप, न्यूमोनिया, तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम, शॉक यासारख्या समस्या असू शकतात. हा त्रास आणखी वाढला तरी मृत्यूचा धोकाही वाढू शकतो.
वेळीच घ्या खबरदारी : हवामान बदलताना सामान्य फ्लू आणि संसर्गाची प्रकरणे वाढतात. त्यामुळे इन्फ्लूएंझा आणि त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते. तसेच तो संसर्ग दीर्घकाळ टिकत असल्याचे मत भोपाळचे जनरल फिजिशियन डॉ. राजेश शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या संसर्गाच्या बळींची संख्या पाहिली यावेळी विषाणूजन्य संसर्गाची अधिक प्रकरणे दिसून येत आहेत. त्यामुळेच सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. परंतु यासाठी H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या प्रसारापेक्षा हंगामी आणि हवामानातील बदल हे कारण मानणे अधिक योग्य ठरेल. याशिवाय कोरोनानंतर लोकांमध्ये होणारी प्रतिकारशक्ती कमी झाल्याने सध्या कोणत्याही प्रकारचे संसर्ग होत असल्याचेही डॉ शर्मा यांनी स्पष्ट केले.
कशी घ्यावी काळजी : H3N2 इन्फ्लूएंझा संसर्ग असो किंवा इतर कोणताही विषाणूचा प्रसार रोखणे आवश्यक आहे. विषाणूच्या प्रभावाखाली येऊ नये यासाठी सर्व शक्य प्रयत्न केले पाहिजेत. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सुरक्षेच्या सर्व खबरदारी घेण्यासोबतच आहाराची काळजी घेणेही अत्यंत आवश्यक आहे. संसर्ग रोखण्यासाठी काही खबरदारी आणि उपाय खालीलप्रमाणे आहेत.
- गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा.
- घरातील एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या संसर्गाची लक्षणे दिसत असल्यास, त्यांना मास्क घालण्यास सांगा. त्यांच्या सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि शक्यतो त्यांच्यापासून शारीरिक अंतर ठेवा.
- आहाराची विशेष काळजी घ्या. ताजी कडधान्ये, धान्ये आणि भाज्या यांचा पचण्याजोगा आहार योग्य वेळी घ्या.
- तुमच्या आहारात हंगामी फळांचे प्रमाण वाढवा. तसेच, दररोज आवश्यक प्रमाणात पाणी प्या.
- शक्यतो थंड किंवा कोल्ड्रिंक्ससारखी पेये टाळा. त्यांच्या जागी ताज्या फळांचे रस, लिंबू पाणी, नारळ पाणी घ्या. परंतु संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यास दही, मठ्ठा किंवा ताक इत्यादींचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.
- वृद्ध, मुले आणि घरातील सदस्यांना मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, तीव्र श्वसनाचे आजार किंवा मूत्रपिंडाच्या समस्या असल्यास योग्य खबरदारी घ्या.
- आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घ्या.
- खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंडावर ठेवा रुमाल
- वारंवार हात धुवा. सामान्य संक्रमण आणि इन्फ्लूएंझा व्यतिरिक्त, डोळ्यांच्या संसर्गाची किंवा पोट खराब होण्याची प्रकरणे देखील खूप वाढतात. अशा परिस्थितीत केवळ साबणाने हात न धुता काहीही खाणे नव्हे तर डोळ्यांना आणि चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळले पाहिजे.
- तुमच्या नियमित दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा.
हेही वाचा - World Oral Health Day 2023 : तोंडाचे आरोग्य उत्तम राखणे आहे महत्वाचे, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी