हैदराबाद : शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यापासून ते शरीरातील लाल रक्त पेशींचे उत्पादन नियंत्रित करण्यापर्यंत, मूत्रपिंड संपूर्ण आरोग्य टिकवून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. परंतु आपण आपल्या आतड्याच्या आरोग्याकडे जेवढे लक्ष ठेवतो तितकेच आपण आपल्या मूत्रपिंडाची काळजी घेतो का ? नसल्यास, जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त मूत्रपिंडाचे महत्त्व आणि त्यांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊ या.
दर वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक मूत्रपिंड दिन साजरा केला जातो. शरीरात मूत्रपिंडाचे महत्त्व, त्यासंबंधी आजार आणि त्याची कशी काळजी घ्यायची याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस असतो. या वर्षी ११ मार्चला हा दिवस आला आहे. यावेळची संकल्पना आहे ‘ मूत्रपिंडाच्या आजारासोबत व्यवस्थित जगा ’. २००६ मध्ये पहिल्यांदा जागतिक मूत्रपिंड दिन साजरा झाला. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी (आयएसएन) आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन (आयएफकेएफ) यांचा यामागे संयुक्त पुढाकार होता.
२०१७ मध्ये लान्सेटने प्रकाशित केल्याप्रमाणे क्रोनिक किडनी डिसिज ( सीकेडी ) म्हणजे मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने ६९७.५ दशलक्ष रुग्ण पीडित होते आणि त्यातले १.२ दशलक्ष लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला. यापैकी एक तृतीयांश रुग्ण देन देशांमध्ये राहात होते. ते देश म्हणजे चीन आणि भारत.
या दिवसाची उद्दिष्टे
- मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांना क्रोनिक किडनी डिसिज ( सीकेडी ) होऊ शकतो. त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे.
- मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांना पद्धतशीरपणे तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- प्रतिबंधात्मक उपाय वाढवणे
- सीकेडीचा धोका कमी करण्यासाठी सर्व मेडिकल व्यावसायिकांना त्याबद्दल जागरुक करणे. विशेष करून जिथे धोका जास्त आहे तिथे हे करणे आवश्यक आहे.
- स्थानिक आणि राष्ट्रीय आरोग्य अधिकाऱ्यांवर सीकेडी कमी करण्याची जबाबदारी देणे. जागतिक मूत्रपिंड दिवशी सर्व सरकारांनी याबद्दल कृती करावी आणि मूत्रपिंड तपासणी जास्त व्हावी.
- मूत्रपिंडात बिघाड झाला तर मूत्रपिंड प्रत्यारोपण हा उत्तम पर्याय आहे. अवयव दान करणे म्हणजे एखादा जीव वाचवण्यासारखे आहे.
मूत्रपिंडाच्या कार्याचे महत्त्व
मूत्रपिंड खूप महत्त्वाचे अवयव आहेत. ते शरीरातले विषारी पदार्थ बाहेर फेकते आणि रक्तातील अतिरिक्त द्रवही काढून टाकते. मूत्रपिंडामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि ते लाल रक्त पेशींची निर्मिती करते. आपल्या हाडांचे आरोग्यही मूत्रपिंडावर अवलंबून आहे. शरीरातले नको असलेले पदार्थ बाहेर फेकणे, आपले आरोग्य सांभाळणे आणि तयार झालेल्या हार्मोन्सचे कार्य नियंत्रित ठेवणे ही महत्त्वाची कामे मूत्रपिंड करतात.
क्रोनिक किडनी डिसिज ( सीकेडी ) गंभीर मूत्रपिंड विकार
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या ( सीडीसी ) म्हणण्याप्रमाणे सीकेडीमध्ये मूत्रपिंडात बिघाड होतो. ते रक्ताचे शुद्धीकरण करू शकत नाही. त्यामुळे नको असलेले पदार्थ आणि अतिरिक्त द्रव रक्तात तसेच राहतात. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोक येऊ शकतो.
सीडीसीने सांगितलेले सीकेडीचे काही दुष्परिणाम
- अॅनिमिया किंवा लाल रक्त पेशी कमी असणे.
- संसर्ग होण्याचे प्रमाण वाढणे.
- कॅल्शियमची पातळी कमी होणे, पोटॅशियमची पातळी वाढणे आणि रक्तातील फॉस्फरसची पातळी वाढणे.
- भूक न लागणे किंवा कमी खाणे.
- औदासिन्य येणे.
यामध्ये प्रत्येक रुग्णाप्रमाणे आजाराचे गांभीर्य बदलू शकते. पण आरोग्याची स्थिती काही काळाने खराब होते. जर वेळेवर उपचार दिले गेले नाहीत तर ते मूत्रपिंड निकामी होऊ शकते आणि लवकरच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे रोग होऊ शकते. मूत्रपिंडांने कार्य करणे थांबवल्यास डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची आवश्यकता असू शकते. सीडीसी असेही नमूद करते की मूत्रपिंडाचा आजार असलेल्या सर्व रूग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होतेच असे नाही.
महत्त्वाचे ५ जोखिमीचे आजार
- मधुमेह
- उच्च रक्तदाब
- हृदयरोग
- कुटुंबात सीकेडीची पार्श्वभूमी
- लठ्ठपणा
मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी काय कराल ?
डॉ. एल एच एच हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित चटर्जी म्हणतात, “ बरीच औषधे आणि पेन किलर टाळा. मूत्रपिंड निकामी होणे आणि मूत्रपिंडाच्या इतर आजारांमागे एक मुख्य कारण म्हणजे बरीच औषधे घेणे. म्हणून जेव्हा शक्य असेल तेव्हा, नैसर्गिक उपचाराला प्राधान्य द्या आणि शक्य असल्यास आयुर्वेदिक पर्याय स्वीकारा. ” मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी सुचविलेले ८ गोल्डन रुल्स पुढीलप्रमाणे –
- रक्तातली साखर नियंत्रणात ठेवा.
- स्वत:ला हायड्रेटेड ठेवा.
- योग्य वजन कायम ठेवा.
- अति मद्यपान करू नका आणि धूम्रपान पूर्णपणे सोडा.
- रक्तदाब नेहमी तपासा.
- आरोग्यदायी आहार घ्या.
- नियमित व्यायाम करा.
- नियमित आरोग्य तपासणी करा.