हैदराबाद - गरोदरपणातील व्हिटॅमिन-डीच्या पातळीचा संबंध मुलाच्या आयक्यू म्हणजेच बुध्यांकाशी असल्याचे संशोधनात समोर आले. गरोदर मातेमध्ये व्हिटॅमिन-डी जास्त असेल तर बाळाचा बुध्यांक जास्त असतो. 'जर्नल ऑफ न्यूट्रिशन'मध्ये प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार आईने घेतलेल्या व्हिटॅमिन-डी पुरवठा गर्भाशयातील बाळाला होतो. त्यामुळे त्याच्या मेंदूचा विकास होण्याच्या प्रक्रियेचे नियमन करण्यास मदत होते.
संशोधकांच्या मते जास्तीत जास्त लोकांमध्ये, म्हणजे गरोदर स्त्रियांमध्येही व्हिटॅमिन-डीची कमतरता असते. मात्र, कृष्णवर्णीय स्त्रियांमध्ये या कमतरतेचे प्रमाण जास्त आहे. अमेरिकेच्या 'सिएटल चिल्ड्रन रिसर्च इन्स्टिट्युट'मधील अभ्यासिका मेलिसा मेलफ यांनी सांगितले की, "मेलॅनिन रंगद्रव्य सूर्यापासून त्वचेचे रक्षण करते. मात्र, ते अतिनील किरणांना रोखून, त्वचेमध्ये व्हिटॅमिन डीची निर्मिती देखील कमी करते." याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आम्ही काम करतो. जन्मापूर्वीच बाळाला व्हिटॅमिन मिळावे आणि त्याच्या मेंदूची वाढ चांगली व्हावी यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मेलिसा मेलफ यांनी सांगितले.
एका अभ्यासानुसार अमेरिकेत ८० टक्के कृष्णवर्णीय गरोदर महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते. या अभ्यासात सहभागी झालेल्या महिलांपैकी सुमारे ४६ टक्के मातांना त्यांच्या गरोदरपणात व्हिटॅमिन डीची कमतरता आढळली आणि गोऱ्या महिलांच्या तुलनेत कृष्णवर्णीय स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होते. २००६ पासून संशोधकांनी गरोदर महिलांना या अभ्यासात सामील करून घेतले. इतक्या वर्षात त्यांच्या मुलांचे आरोग्य आणि विकास यांची माहिती गोळा केली.
बुध्यांकासाठीच्या इतर घटकांवर नियंत्रण ठेवल्यानंतर गरोदरपणात व्हिटॅमिन डीची पातळी जास्त असलेल्या स्त्रियांच्या ४ ते ६ वयोगटातल्या मुलांचा बुध्यांक खूप जास्त होता, असे समोर आले. अशा निरीक्षणांच्या अभ्यासाने काही कृती सिद्ध होत नसली तरीही संशोधकांना विश्वास आहे की, या निष्कर्षांचा फायदा पुढच्या संशोधनासाठी होईल. लोक सूर्यप्रकाश किंवा पोषक अन्न याने व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढत नसतील तर नक्कीच त्यांच्यात उणीव राहील, असे मेलिसा म्हणाल्या.
चरबीयुक्त मासे, अंडी, गायीचे दूध, तृणधान्ये यात व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. गरोदरपणात व्हिटॅमिन डीची योग्य पातळी निश्चित करण्यासाठी अतिरिक्त संशोधन आवश्यक आहे. मेलिसा यांना आशा आहे, की त्यांच्या संशोधनामुळे गर्भवती महिलांसाठी पौष्टिक आहाराची शिफारस नक्कीच केली जाईल.