जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मोतिबिंदू आणि काचबिंदूनंतर कॉर्नियाला झालेल्या दुखापतीमुळे दृष्टी कमी होते आणि अंधत्व येते. म्हणूनच तुम्ही दान केलेल्या डोळ्यांमुळे अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. भारतात जवळजवळ 3 दशलक्ष लोकांना तुम्ही केलेल्या नेत्रदानामुळे दृष्टी मिळू शकते. त्यात जास्त करून 12 वर्षांपेक्षा लहान असलेली मुले आहेत.
नेत्रदान कोण करू शकते ?
सर्व वयोगटातले स्त्री, पुरुष, जात, धर्म, रक्त गट कुठलाही असला तरीही नेत्रदान करू शकतात.
जे लोक जवळचा किंवा दूरचा चष्मा लावतात किंवा लेन्सेस घालतात, ते नेत्रदान करू शकतात. डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली असेल तरीही नेत्रदान करता येते.
मधुमेह, रक्तदाब, अस्थमा आणि संसर्गजन्य आजार नसलेले लोक नेत्रदानकरू शकतात.
नेत्रदान कोण करू शकणार नाही ?
एड्स, हिपॅटायटीस बी किंवा सी, रेबीज, कॉलरा, टिटॅनस, तीव्र लुकेमिया, सेप्टिसिमिया, मॅनेन्जायटिस किंवा एन्सेफलायटिस या आजारांनी रुग्णाचा मृत्यू झाला असेल तर
नेत्रदान कसे करायचे ?
तुम्ही प्रमुख रुग्णालये आणि नेत्रपेढ्याकडे उपलब्ध असलेला नेत्रदानाचा फॉर्म भरून डोळे तारण ठेवू शकता. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाइन रजिस्टर करू शकता.
https://www.ebai.org/donator-registration/
तुम्ही नेत्रदानाचा फॉर्म भरताना कुटुंबातल्या लोकांना याची कल्पनाद्या. कारण तेच संबंधित अधिकाऱ्यांना कळवणार असतात. तुम्हाला नेत्रदाता कार्ड दिले जाते. समजा एखाद्याने नेत्रदानाचा फॉर्म भरला नसेल तरीही त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे सदस्य हा निर्णय घेऊ शकतात.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेत्रदात्याच्या कुटुंबातल्या माणसांनी जवळ असणाऱ्या नेत्रपेढीशी त्वरित संपर्क साधावा. तुम्ही 1919 या टोल फ्री नंबरवर फोन करू शकता. हा नंबर भारताच्या सर्व राज्यांमध्ये 24 तास सुरू असतो. मृत व्यक्तीचे डोळे बंद करा. पंखा बंद करा आणि एअर कंडिशनर किंवा कुलर सुरू करा. मृत व्यक्तीचे डोके उशी लावून उभे करा आणि डोळ्यावर ओले सुती कापड ठेवा.
मृत्यूनंतर 6 ते 8 तासात डोळे काढावे लागतात. ही प्रक्रिया घरी किंवा रुग्णालयात केली जाते. प्रशिक्षित डॉक्टरद्वारे डोळे काढले जातात आणि त्याला 10ते 15 मिनिटे लागतात. यात कॉर्निया काढला जातो आणि पूर्ण डोळा नाही. त्यामुळे चेहराविद्रुप होत नाही. दाता आणि त्याच्या कुटुंबाची ओळख गुप्त ठेवली जाते. यात पैसे किंवा फी घेतली जात नाही. एकदा का नेत्रदान झाले की मग संस्था तो डोळा कुणाला योग्य आहे याचा शोध घेतात. डोळा ज्याला दिला जातो त्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होते.
नेत्रदानाबद्दल बऱ्याच भ्रामक समजुती आहेत. पण प्रत्येकाने तथ्य समजून घ्यायला हवे. तुमच्या दोन डोळ्यांमुळे तुम्ही दोन अंध व्यक्तींना दृष्टी देऊ शकता. म्हणूनच मिथकांपेक्षा सत्य काय ते समजून घ्या. जेव्हा तुमच्या डोळ्यांचा तुम्हाला उपयोग नसेल, तेव्हा कुणीतरी तुमच्या डोळ्यांनी या सुंदर जगाचाआस्वाद घेत असेल. या उदात्त कारणासाठी आजच पुढे या आणि मानवतेची जपणूक करा !