बर्मिंगहॅम : अनेक महिलांना गरोदरपणात अवेळी गर्भपातामुळे मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागतो. मात्र फळे, भाज्या, सीफूड, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि धान्ये यामुळे गर्भपाताचा धोका कमी होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. गरोदरपणाच्या काही महिन्यापूर्वी आणि नंतरच्या काही महिन्यात स्त्रियांच्या खाण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनातून गर्भपात होण्याच्या कमी किंवा जास्त धोक्याचे पुरावे तपासण्यात आले.
फळांमुळे गर्भपाताचा धोका होतो कमी : फळे, भाज्या, सीफूड, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि धान्ये यांचा समावेश असलेला आहार गर्भपाताचा धोका कमी करतो असे पुरावे या संशोधनातून मिळाले आहेत. हे खाद्यपदार्थ निरोगी संतुलित आहार बनवतात. गर्भधारणेदरम्यान जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेला चांगला आहार खाणे महत्वाचे आहे. या संशोधनात फळांचा आहार जास्त घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका 61 टक्के कमी होतो. पालेभाज्यांचा आहार जास्त प्रमाणात घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका 41 टक्के कमी होतो. दुग्धजन्य पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्यास 37 टक्के धोका कमी होतो. धान्यांचा आहार जास्त घेतल्यास 33 टक्के धोका कमी होतो. तर सीफूड आणि अंड्यांचा आहार जास्त घेतल्यास 19 टक्के धोका कमी होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. हे संशोधन जर्नल फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी द टॉमीज नॅशनल सेंटर फॉर मिस्कॅरेज रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे.
प्रक्रिया केलेल्या आहारामुळे गर्भपाताचा धोका दुप्पट : पूर्व परिभाषित आहाराचे प्रकार, भूमध्य आहार किंवा प्रजनन आहार देखील गर्भपाताच्या धोक्याशी जोडला जाऊ शकतो. यापैकी कोणत्याही आहाराचे पालन केल्याने धोका कमी होतो किंवा वाढतो याचा पुरावा या संशोधकांना सापडला नाही. मात्र सकस आहार, किंवा अँटिऑक्सिडंट स्त्रोतांनी समृद्ध असलेला आहार गर्भपात होण्याचा धोका कमी करू शकतात. प्रक्रिया केलेल्या आहारामुळे गर्भपात होण्याचा धोका दुप्पट असल्याचा दावाही संशोधक डॉ येलिन चुंग यांनी केला आहे.
गर्भपाताचे वाढले प्रमाण : संशोधकांनी केलेले हे संशोधन गर्भधारणेच्या कालावधीवर केंद्रित होते. गर्भधारणेच्या पहिल्या 3 महिन्यांपूर्वी आणि दरम्यानचा कालावधी याचा या संशोधनात समावेश करण्यात आला होता. पुनरुत्पादक वयाच्या एकूण 63 हजार 838 महिलांकडून गोळा केलेला डेटा या संशोधनात समाविष्ट करण्यात आला होता. या महिलांच्या आहारावरील माहिती विविध प्रश्नावलीद्वारे गोळा करण्यात आली होती. गर्भपात होणे सामान्य असून 6 गरोदर महिलांपैकी एका महिलेचा गर्भपात होत असल्याचा दावा संशोधक येलिन चुंग यांनी केला.
सकारात्मक जीवनशैलीमुळे होतो फायदा : बाळाच्या गुणसूत्रांच्या समस्यांपासून ते गर्भाशयात संक्रमणापर्यंत गर्भपाताची अनेक कारणे असल्याचेही संशोधकांनी यावेळी स्पष्ट केले. तरीही गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या सुमारे 50 टक्के नुकसानाचे स्पष्टीकरण करण्यात आले नाही. सकारात्मक जीवनशैलीमुळे गर्भपात होण्याचा धोका कमी करण्यात महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो. हे जाणून जोडप्यांना त्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास सक्षम वाटू शकते, असेही संशोधक ज्युलिएट वॉर्ड यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Air Pollution Heat Affect Sleep : वायू प्रदूषण, वाढत्या तापमानामुळे होऊ शकते झोपमोड