कोविड १९ आणि मधुमेह यांच्यातील परस्पर संबंध बारकाईने समजून घेण्यासाठी ईटीव्ही भारत सुखीभावच्या टीमने हैदराबादच्या व्हीआयएन हॉस्पिटलमधील सल्लागार फिजिशियन एमडी (जनरल मेडिसिन) डॉ. राजेश वुकला यांच्याशी बातचीत केली. ते म्हणतात की दुर्दैवाने, मधुमेही लोकसंख्येचा विचार केला तर भारत जागतिक आघाडीवर आहे. म्हणूनच, आपल्या देशात कोविड १९ संबंधित अधिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
डॉ. राजेश वुकला सांगतात, कोविड १९ आणि मधुमेह यांच्यातला संबंध ३ वेगवेगळ्या प्रकारे सांगता येईल.
1. मधुमेहींमध्ये कोविडमुळे गंभार समस्या उद्भवतात. त्यांच्या शरीरात कोरोना जास्त आक्रमक होतो.
2. मधुमेह असलेल्यांना गंभीर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
3. गंभीर संक्रमण किंवा सौम्य संक्रमण असले तर देण्यात आलेले स्टिरोईड यामुळे मधुमेह उद्भवू शकतो. शिवाय सौम्य कोविड असलेल्यांना अपात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्टिरोईडसारखे उपचार केले तर स्थिती जास्त बिघडू शकते.
शिवाय ज्या लोकांना अगदी काठावर मधुमेह होता त्यांचीही साखरेची पातळी या संसर्गामुळे अचानक वाढते, हेही आता लक्षात आले आहे.
“ दुसरी काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे आता समोर आलेले काळ्या बुरशीचा संसर्ग. याचा संबंध थेट रक्तातल्या साखरेच्या पातळीशी येतो. अगोदर कोविड १९ वरच्या उपचारासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे नव्हती. पण आता सिरोईड्सना मान्यता मिळालेली आहे. कारण यामुळे कोविड १९ बरा होत आहे. पण यांचा वापर योग्य प्रकारे न केल्यामुळे म्युकर मायकोसिस किंवा काळी बुरशीचा संसर्ग होत आहे. ”
स्टिरोईड्स आणि मधुमेह
सध्या स्टिरोईड्स जास्त वापरले जातात. त्याचे डोसही जास्त दिले जात आहेत. अगोदरच हे डोस देतात आणि काही लक्षणे नसली तरीही देतात. यामुळे संसर्गात वाढ, मधुमेह होणे आणि कोविडमधून बरे झाल्यानंतरही गुंतागुंत होणे, अशी स्थिती उद्भवते. “ आतापर्यंत जी काही औषधे वापरली गेली आहेत, त्यापैकी केवळ स्टिरोईड्समुळेच कोविड १९ बरा होतो हे सिद्ध झाले आहे. हे जगभरात स्वीकारले गेले आहे आणि याचा परिणाम चांगला होत आहे. पण इतर गोष्टी तपासणे गरजेचे आहे. ”
आमचे तज्ज्ञ म्हणतात की आपण स्टिरोईड्सचा गैरवापर होताना पाहत आहोत. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात स्टिरोईड्स टाळले पाहिजेत. कारण ते विषाणूची प्रतिकृती वाढवतात. स्टिरोईड्सचा मुख्य हेतू म्हणजे विषाणूची दाहक प्रतिक्रिया कमी करणे, जी संक्रमणाच्या कालावधीच्या उत्तरार्धात ( 7-10 दिवस ) दरम्यान दिसून येते. जर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात स्टिरोईड्सचा वापर केला गेला नाही तर त्याचा रुग्णांवर, विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. जर स्टिरोईड्सच्या अयोग्य वापरामुळे मधुमेह जास्त वाढला असेल तर बरे होण्याच्या प्रक्रियेस देखील विलंब होऊ शकतो.
काय लक्षात ठेवायचे ?
तुम्ही तुमच्या ज्ञानाप्रमाणे स्टिरोईड्स घेऊ नका. हे केवळ वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली घेतले पाहिजे. संसर्गाच्या कालावधीत ( १४ दिवस ), डॉ. वुकला विशेषत: मधुमेहींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी दररोज मोजण्याचा सल्ला देतात. मधुमेहाचे पुरेसे नियंत्रण आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. तसेच, स्टिरोइड्सचा वापर थांबेपर्यंत मधुमेह नियमितपणे मोजला जावा.
मधुमेह आहे हे गृहित धरून डॉ. राजेश वुकला सांगतात, तणावामुळे शरीरातली साखरेची पातळी वाढते. कोविड १९ आहे हे कळल्यावरही तुम्ही जास्त ताण घेऊ नका. विषाणूचा संसर्ग झाला, असे कळले तर चिंता करू नका. योग्य आराम गरजेचा आहे. तुम्हाला सांगितलेली सर्व औषधे वेळेत घ्या. कुठलेही औषध चुकवू नका. भरपूर झोप घ्या. प्रकृतीतल्या चढउतारांवर लक्ष ठेवा आणि काही वाटले तर सरळ डॉक्टरांशी संपर्क करा. कारण कदाचित मधुमेहाचा जास्त त्रास होऊ शकतो.
हेही वाचा - ट्रोल जीएसटीच्या कक्षेत आणले जायला हवे