वॉशिंग्टन : गरोदर महिलेला गर्भधारणेदरम्यान कोविड-19 ची लागण झाल्यास जन्मलेल्या मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचा धोका जास्त असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. बोस्टनमधील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या एमडी लिंडसे टी फोरमन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 2019 पासून युनायटेड स्टेट्समध्ये 100 दशलक्षाहून अधिक COVID-19 प्रकरणे नोंदवण्यात आल्याचा दावाही यावेळी करण्यात आला आहे. हे संशोधन जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
बाळांना लठ्ठपणाचा धोका : गरोदर महिलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. 9 टक्के गरोदर स्त्रियांना कोरोनाची लागण झाल्याचा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये गर्भाच्या विकासादरम्यान लाखो बाळांना संसर्गास सामोरे जावे लागते. गर्भाशयात COVID-19 च्या संपर्कात आलेल्या मुलांच्या वाढीची पद्धत सुरुवातीच्या काळात बदललेली असते. त्यामुळे त्यांचा लठ्ठपणा, मधुमेह, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढू शकत असल्याचा दावाही लिंडसे टी फोरमन यांनी केला आहे.
बाळाचे पहिल्या वर्षात वाढते जास्त वजन : संशोधकांनी गर्भधारणेदरम्यान कोविड-19 झालेल्या मातांच्या पोटी जन्मलेल्या 150 अर्भकांचा अभ्यास केला. त्यातील ज्यांच्या मातांना जन्मपूर्व संसर्ग झाला नाही, अशा 130 बाळांच्या तुलनेत त्यांचे वजन कमी होते. मात्र त्यानंतर पहिल्या वर्षात बाळाचे जास्त वजन वाढते. हे बदल बालपणात दिसून आले असून पुढे लठ्ठपणा, मधुमेह, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका अधिक असल्याचेही यावेळी लिंडसे टी फोरमन यांनी स्पष्ट केले. गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांवर कोविड-19 चे परिणाम समजून घेण्यासाठी अद्याप बरेच संशोधन आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रतिबंधक धोरणांची व्यापक अंमलबजावणी : गरोदर महिलांना कोरोनात संसर्ग झाल्यास त्यांच्या बाळांवर त्याचे विपरित परिणाम होतात. त्यामुळे गर्भाशयात कोविड-19 संसर्गाच्या संपर्कात आलेल्या मुलांबाबत दीर्घकालीन पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तसेच गर्भवती महिलांमध्ये कोविड-19 प्रतिबंधक धोरणांची व्यापक अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, असे मॅसॅच्युसेट्स जनरलच्या एम डी अँड्रू एडलो यांनी सांगितले. या संशोधनाचा पाठपुरावा करण्यासाठी आणखी संशोधन गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हे संशोधन एंडोक्राइन सोसायटीच्या जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित करण्यात आल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
हेही वाचा - Twitter Source Code Leaked : ट्विटरचे कोड गिट हबवर ऑनलाइन झाले लीक; ट्विटरने पाठवली कॉपीराइट उल्लंघनाची नोटीस