हैदराबाद : सध्या देशात नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. आज नवरात्री उत्सवाचा सहावा दिवस आहे. या दिवशी माता कात्यायनीची पूजा करण्यात येते. नवरात्रीच्या नऊ दिवसात भाविक माता दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा करुन उपवास देखील करतात. भाविक भक्त दुर्गा देवीचे माता कात्यायनी हे सहावे रूप असल्याचे मानतात. माता कात्यायनीला महिषासुर मर्दिनी म्हणूनही ओळखले जाते.
कोण आहे माता कात्यायनी ? : प्राचीन ग्रंथांनुसार महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महादेव या देवतांच्या एकत्रित शक्तींमधून माता कात्यायनी निर्माण झाल्याची अख्यायिका आहे. माता कात्यायनीच्या आशीर्वादाने उपासकाची पापे धुऊन नकारात्मक शक्ती दूर होत असल्याची भाविकांची धारणा आहे. हिंदू धर्मात महिषासूर हा एक शक्तिशाली अर्धा मनुष्य आणि अर्धा म्हशीपासून बनलेला राक्षस असल्याची अख्यायिका आहे. त्याने त्याची क्षक्ती वाईट मार्गांनी वापरली. शक्तीचा विकृत मार्ग वापरुन त्याने भोळ्या भाबड्या नागरिकांचा छळ केला. त्यामुळे क्रोधित होऊन सर्व देवतांनी माता कात्यायनी तयार करण्यासाठी आपली शक्ती संक्रमित केली. माता कात्यायनीने महिषासुराचा वध केला. देवी आणि राक्षसातील युद्ध हा वाईटावर चांगल्याचा विजय मानला गेला. त्यामुळे विश्वासघातकी राक्षसाचा वध करणारी माता कात्यायनी महिषासुर मर्दिनी म्हणूनही ओळखली जाते. या घटनेला हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले गेले आहे. माता कात्यायनीला महादेवाने त्रिशूळ, भगवान विष्णूने सुदर्शन चक्र, वायू देवाने धनुष्य, इंद्रदेवाने वज्र, ब्रह्मदेवाने जलपात्र असलेले रुद्राक्ष दिल्याची अख्यायिका आहे.
कशी करतात माता कात्यायनीची पूजा : नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भाविक भक्तांनी आपल्या दिवसाची सुरुवात अभ्यंग स्नानाने करून नवीन कपडे घालावीत. घरातील पूजास्थान स्वच्छ करून घेत कात्यायनी मातेच्या मूर्तीला फुले अर्पण करण्यात यावी. याशिवाय भाविकांनी देवीला भोग म्हणून मध आणि नैवेद्य दाखवावा. त्यानंतर मंत्र आणि प्रार्थना करताना हातात कमळाचे फूल घेऊन माता कात्यायनीची पूजा करण्यात यावी. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी राखाडी रंगाला खूप महत्त्व आहे. हे सकारात्मक विचारांना संतुलित करुन भाविकाच्या मनाला स्थिर ठेवते. आपल्याला सर्व गुण मिळवण्यासाठी भाविक भक्त या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करू शकत असल्याची माहिती ज्योतिष्य तज्ज्ञ देतात.
हेही वाचा - World Theatre Day 2023 : जाणून घ्या का साजरा करण्यात येतो जागतिक रंगभूमी दिन, काय आहे इतिहास