हैदराबाद : देशभरात आज दुर्गाष्टमी साजरी करण्यात येत आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा देवीच्या ९ रुपापैकी आठवे रुप असलेल्या महागौरी मातेची पूजा करण्यात येते. महागौरीला 'श्वेतांबरधारा' असेही म्हणतात. महागौरी मातेचे सर्व दागिने आणि कपडे पांढरे असून महागौरी हे नाव मातेच्या पूर्ण गौर वर्णाचे प्रतिनिधित्व करते. माता महागौरी नावाची तुलना तिच्या गोऱ्या रंगामुळे शंख, चंद्र आणि कुंद फुलाशी करण्यात येते.
काय आहे महागौरी मातेच्या इतिहास : तारकासुर नावाच्या राक्षसाने देवतांना त्रास दिला होता. त्यामुळे सगळे देव हतबल झाले होते. केवळ शिवपुत्र तारकासुराला मारू शकत होता. त्यामुळे देवांच्या आज्ञेनुसार देवी सतीने भगवान शिवाशी लग्न करण्यासाठी हिमालयाची कन्या शैलपुत्री म्हणून पुनर्जन्म घेतल्याची अख्यायिका आहे. माता शैलपुत्रीने तिचे स्वरूप प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे मातेचे शरीर काळे झाले. देवीच्या तपश्चर्येने भगवान महादेव प्रकट होऊन त्यांनी मातेचा स्वीकार केला. त्यानंतर महादेवांनी मातेला गंगेच्या पाण्यात स्नान करण्यास सांगितले. त्यामुळे माता पांढर्या प्रकाशासारखी अत्यंत तेजस्वी झाली. त्यामुळे मातेला 'गौरी' असे नाव पडले. देवी महागौरीला अन्नपूर्णा, ऐश्वर्या या नावानेही ओळखले जाते.
- कसा आहे महागौरी मातेचा अवतार : माता महागौरीचे रुप अगदी गौरवर्ण आहे. महागौरी मातेची आभा अगदी दृश्यमान आहे. ही भव्यता शंख, चंद्रासारखी मानली जाते. मातेचे सर्व कपडे आणि दागिने पांढरे आहेत. महागौरीला चार हात असून मातेचे वाहन वृषभ आहे. माता शांत मुद्रेत असल्याचे दिसून येते.
कशी करावी महागौरी मातेची पूजा
- अष्टमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून प्रथम स्नान करावे.
- प्रथेनुसार नवरात्रीच्या 8 व्या दिवशी मातेची पूजा करावी.
- या दिवशी भक्तांनी देवीच्या कवच मंत्राचा जप करावा. ओम देवी महागौराय नमः
- मातेला लाल रंगाची चुनरी अर्पण करावी
- कन्यापूजन करणाऱ्या मुलींना लाल चुनरी भेट द्या.
- चौरंगावर लाल रंगाचे कापड टाकून पूजेची मांडणी करावी
- महागौरी मातेला कुंकू आणि धान्य अर्पण करावे.
- माता दुर्गेच्या या रूपाची पूजा केल्याने भाविकांना सौंदर्याचा विशेष आशीर्वाद मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
- महागौरी मातेला पांढरी फुले अर्पण करुन मातेचा आशीर्वाद घ्यावा.
- नारळाचा प्रसाद मातेला अर्पण करण्यात यावा
कसे करावे कन्या पूजन : अष्टमीला महागौरी मातेची पूजा केल्यानंतर कन्या पूजेचा भाग म्हणून मुलींना विशेष नवरात्री भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाते. या मुली देवीच्या शक्तीचे प्रतीक असल्याचे भाविक भक्त मानतात. भाविक पाय धुवून मुलींना हलवा, पुरी, काळे हरभरे आदी प्रसाद खाऊ घालतात. याव्यतिरिक्त मुलींना देवीचे प्रतीक म्हणून बांगड्या, लाल रंगाचे कपडे आणि इतर भेटवस्तू दिल्या जातात. मुलींच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करून पूजेची सांगता करण्यात येते. मात्र तुम्ही तुमच्या ज्योतिष्यांकडून याबाबतची अधिक माहिती घेऊन पूजा शकता.
हेही वाचा - Chaitra Navratri 2023 : नवरात्रीच्या सातव्या दिवशी करा कालरात्री मातेची पूजा, जाणून घ्या कोण आहे कालरात्री माता