हैदराबाद : देशभरात सध्या नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येत असून आज नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस आहे. देशभरात चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री मातेची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. कालरात्री माता हे दुर्गेचे सर्वात हिंसक आणि भयंकर रूप आहे. मातेचा रंग गडद काळा असून केस विस्कटलेले आहेत. माता कालरात्रीने कवटीची माळ घातली आहे. तिला तीन डोळे असून मातेची जीभ बाहेर आली आहे. हे रक्ताच्या भुकेचे लक्षण आहे. याशिवाय मातेला चार हात आहेत, त्यापैकी दोन हातांमध्ये विळा आणि वज्र आहे. उजवे दोन हात वरद मुद्रा म्हणजे आशीर्वाद आणि रक्षा मुद्रेमध्ये आहेत.
काय आहे कालरात्री मातेची कथा : कालरात्री माता दुर्गा मातेचे सातवे रूप असल्याची अख्यायिका आहे. रक्तबीज नावाच्या राक्षसाचे रक्त जेव्हा जमिनीवर पडते, तेव्हा नवीन राक्षसाचा जन्म होत असल्याचे वरदान त्याला होते. या वरदानाने रक्तबीज राक्षसाला अजिंक्य बनवले होते. कोणतेही देव त्याला मारू शकत नव्हते. त्यामुळे रक्तबीज राक्षसाचा पराभव करण्यासाठी देवांनी दुर्गादेवीकडे याचना केली. जगाला वाचवण्यासाठी दुर्गा मातेने रक्तबीजाशी युद्ध पुकारले. उलट राक्षसानेही मातेवर पूर्ण ताकदीने हल्ला केला. या लढाईत रक्तबीज राक्षसाच्या जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून अधिकाधिक रक्तबीजांचा जन्म झाला. त्यामुळे त्याचा पराभव करणे अशक्य झाले.
कालरात्री मातेचा घेतला अवतार : रक्तबीज राक्षसाचा पराभव करण्यासाठी दुर्गा मातेला अखेरीस कालरात्री मातेचा अवतार घ्यावा लागला. सर्वात शक्तिशाली आणि भयंकर रूप म्हणून दुर्गा मातेने कालरात्री मातेचा अक्राळ विक्राळ अवतार घेतला. दुर्गा मातेचा असा अक्राळ विक्राळ अवतार रणांगणात पाहताच रक्तबीज राक्षसाने घाबरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मातेने पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर दुर्गा मातेने त्याचा वध करत रक्ताचा प्रत्येक थेंब आपल्या जिभेने शोषून घेतला. त्यामुळे दुसरा रक्तबीज जन्माला येण्यापासून रोखला गेला.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी रक्तबीज राक्षसावर विजय : कालरात्री मातेने रक्तबीज या कुख्यात राक्षसाचा वध नवरात्रीच्या सातव्या दिवशी केल्याची अख्यायिका आहे. दुर्गा मातेने रक्तबीज राक्षसाला ठार केल्यानंतर देवदेवतांनी इतर राक्षसांवर सहज विजय मिळवला. कालरात्री मातेने रक्तबीज राक्षसाचा चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवशी वध केल्याने हा विजय दिवस साजरा केला जातो. कालरात्री माता ही अज्ञान आणि अंधकाराचा नाश करणारी असल्याचे मानले जाते. कालरात्री मातेची कथा आपल्याला वाईट कितीही शक्तिशाली असला तरी आपण देवावरील श्रद्धा आणि भक्तीने त्या वाईट शक्तींवर मात करू शकतो, असा संदेश देते.
- कालरात्री मातेची पूजा : नवरात्रीच्या सातव्या दिवशी खालील पद्धतीचा अवलंब करून कालरात्री देवीचा आशीर्वाद मिळू शकतो. आरती करून पूजेची सांगता केल्याने आपल्याला कालरात्री मातेचा आशीर्वाद मिळू शकतो.
- सकाळी लवकर उठून आंघोळ करून पूजेचे ठिकाण स्वच्छ करावे.
- पूजा कक्ष दिवे, फुले आणि रांगोळीने सजवण्यात यावे.
- खोलीच्या मध्यभागी कालरात्री मातेची मूर्ती स्थापित करण्यात यावी.
- धूप-दीप लावून श्रीगणेश आणि कालरात्री मातेची पूजा करण्यात यावी.
- कालरात्री मातेला गूळ, नारळ आणि तीळ आवडतात.
- कालरात्री मातेला रातराणी-चमेलीची फुले आवडतात.
- कालरात्री मातेला फुले आणि फळांसह पूजेतील वस्तू अर्पण करण्यात याव्यात.
- कालरात्री मातेला संपूर्ण किंवा कापलेले लिंबू देखील अर्पण केले जाते.
- 27 किंवा दुप्पट लिंबांचा हार अर्पण केल्याने देखील कालरात्री मातेचा आशीर्वाद मिळतो.
- कालरात्री मातेच्या जपाचा मंत्र : ओम देवी कालरात्राय नमः
- कालरात्री मातेचा स्तुती मंत्र : यं देवी सर्वभूतेषु मां कालरात्रि रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
- कालरात्री मातेची प्रार्थना : एकवेणी जपकर्णपुरा नग्न खरस्तिता. लंबोष्ठी कर्णिककर्णी तेली भक्त देह । वांपडोल्लसल्लोळ लताकांतकभूषणा । वर्धन मूर्ध्वजा कृष्ण कालरात्रिर्भयंकारी ॥