हैदराबाद : पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान पुण्यातील आनंदी गोपाळ जोशी यांना मिळाला आहे. मात्र आनंदी गोपाळ जोशी यांचा डॉक्टर होण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यांचे लग्न त्यांच्यापेक्षा वयाने 20 वर्षे मोठ्या असलेल्या गोपाळ जोशी यांच्यासोबत झाला होता. आनंदीबाईंना वयाच्या 14 व्या वर्षीच मूल झाले. मात्र 10 दिवसाचे मूल उपचाराअभावी दगावल्याने त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांच्या डॉक्टर होण्याची ही खडतर कहाणी अनेकांना प्रेरणादायी अशीच आहे.
कोण होत्या आनंदी गोपाळ जोशी : कल्याण परिसरातील गणपत अमृतेश्वर जोशी हे आनंदीबाईंचे वडील होते. त्यांचे लग्नाच्या अगोदरचे नाव यमुनाबाई असे होते. आनंदीबाई यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील गोपाळ जोशी यांच्याशी झाल्याने त्यांच्या आयुष्याने मोठी कलाटणी घेतली. गोपाळ जोशी हे पोस्टात नोकरीला होते. आनंदीबाईंने वयाच्या 14 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. मात्र बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे आनंदीबाई यांचे बाळ 10 व्या दिवशीच दगावले. बाळ दगावल्याचा जोरदार धक्का आनंदीबाईंना बसला. त्यामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरवले.
असा सुरू झाला खडतर प्रवास : गोपाळ जोशी यांनी आनंदीबाईंना डॉक्टर करण्यासाठी मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे गोपाळ जोशी यांची अगोदर अलिबाग येथे बदली झाली. मात्र तेथेही आनंदीबाईंना शाळेत प्रवेश न मिळाल्याने गोपाळ जोशी यांनी तत्कालिन कलकत्ता येथे बदली करुन घेतली. कलकत्ता येथे बदली झाल्यानंतर आनंदीबाई इंग्लिश आणि संस्कृत लिहणे, वाचणे शिकू लागल्या. गोपाळ जोशी यांनी लोकहितवादी यांची शतपत्रे वाचल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला उच्च शिक्षण देण्याचे ठरवले.
वैद्यकीय शिक्षणासाठी धर्म बदलण्याची अट : गोपाळरावांनी अमेरिकेत काही ठिकाणी पत्रव्यवहार करुन आनंदीबाईंना डॉक्टर करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असल्यास ख्रिश्चन धर्म स्विकारण्याची अट होती. गोपाळ जोशी हे कट्टर हिंदू धर्मीय होते. त्यामुळे त्यांनी मोठ्या चिकाटीने प्रयत्न करुन आनंदीबाईंना 1883 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी ख्रिस्ती धर्म न स्विकारता पेन्सिल्व्हिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर त्यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. मात्र प्रवासातील दगदग यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. यात त्यांना अमेरिकेतील काही नागरिकांनीही चांगलीच मदत केली. तत्कालिन व्हाईसराय यांनीही आनंदीबाई यांना 200 रुपयाचा निधी दिला होता.
हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्रावर सादर केला प्रबंध : मोठे कष्ट आणि जिद्दीमुळे आनंदीबाई यांना 1886 मध्ये एमडीची पदवी प्रदान करण्यात आली. आनंदीबाई यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम डीच्या पदवीसाठी हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र या विषयावर आपला प्रबंध सादर केला. मात्र अमेरिकेतून परतल्यावर त्यांना क्षयरोगाची लागण झाली. त्यातच वयाच्या 20 व्या वर्षी 26 फेब्रुवारी 1887 ला आनंदीबाईंचा मृत्यू झाला. आपल्या कर्तृत्वाने जागापुढे आदर्श निर्माण करणारी आई पहिली डॉक्टर झाली. मात्र क्षयरोगाने घात केला. 31 मार्च 1865 हा त्यांचा जन्मदिन असून आज त्यांची जयंती आहे, त्यानिमित्त त्यांना ईटीव्ही भारतकडून विनम्र अभिवादन.
हेही वाचा - Gateway Of India : ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज व महाराणीच्या स्वागतासाठी उभारला होता गेट वे ऑफ इंडिया, जाणून घ्या इतिहास