हैदराबाद - चहा, कॉफी किंवा अल्कोहोल (मद्य) यांसारख्या उत्तेजक पेयांबद्दल आपण बऱ्याचदा ऐकले असेलच. जे झोपण्यापूर्वी घेतल्यास तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकतात किंवा तुमच्या झोपेच्या पद्धतीत आणि गुणवत्तेत अडथळा निर्माण करू शकतात. परंतु, रात्रीच्या झोपेसाठी खरोखर मदत करू शकणार्या काही पदार्थांविषयी किंवा पेयांविषयी आपणाला माहीत आहे का? नसल्यास, येथे चांगली झोप येण्यास मदत करणारे काही पदार्थ दिले आहेत. जे तुम्हाला रात्री चांगली झोप येण्यास मदत करु शकतात. ज्यामुळे तुमची सकाळ शांत आणि चिंतामुक्त होण्यास मदत होते.
१. गरम दूध
झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यावे, असा सल्ला तुम्ही तुमच्या आजीकडून ऐकला असेलच. त्यामागील खरे कारण म्हणजे दुधामध्ये ट्रायप्टोफनसह कॅल्शियम, मेलाटोनिन आणि व्हिटॅमिन डी असते. हे चारही घटक चांगली झोप येण्यास मदत करतात. शिवाय थोडीशी चव आणि आरोग्याच्या इतर फायद्यांसाठी आपण त्यात थोडीसी हळदही मिसळू शकतो.
२. नट्स (सुका मेवा)
सर्व प्रकारच्या नट्समध्ये कमी- जास्त प्रमाणात मेलाटोनिनसह मॅग्नेशियम, ट्रायप्टोफन आदी खनिजे उपलब्ध असतात. बऱ्याच अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, यातील घटक पदार्थाच्या मदतीने निद्रानाश सारख्या आजारावर मात केली जावू शकते.
३. कॅमोमाइल चहा
कॅमोमाइल चहा हा चहा प्रकारातील सर्वात प्रसिद्ध चहाचा प्रकार आहे. तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा महत्त्वपूर्ण मानला जातो. यामुळे अधिक चांगली आणि लवकर झोप येण्यास मदत होते. यामध्ये फ्लॅवोनॉइड आणि ॲपिजेनिन, अँटीऑक्सिडंट्स असतात. जे निद्रानाश कमी करण्यास मदत करतात.
४. किवी
किवी हे फळ ‘व्हिटॅमिन सी’ने समृद्ध असते. किवीमध्ये कॅलरी कमी असतात आणि पौष्टिकता अधिक असते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, मेलाटोनिन, फोलेट, मॅग्नेशियम आदी घटक पदार्थ असतात. हे सर्व घटक उत्तम झोप येण्यास मदत करणारे घटक म्हणून ओळखले जातात.
५. टर्की
थँक्सगिव्हिंगच्या रात्री जेवणामध्ये टर्की घेतल्यानंतर लोकं चांगल्या झोपेचा आनंद कसा काय घेतात? यात काही आश्चर्य नाही. कारण टर्कीमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. शिवाय टर्की ट्रायप्टोफनने समृद्ध असते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो आणि परिणामी चांगली झोप येण्यास मदत होते.
६. फॅटी फिश
सॅल्मन, ट्यूना, मॅकरेल यांसारखे फॅटी फिश व्हिटॅमिन डी आणि ओमेगा -३ फॅटी ॲसिडने समृद्ध असतात. या घटकांमुळे सेरोटोनिन नियमित होण्यास मदत होते. त्याचबरोबर यातील घटक झोपेची गुणवत्ता आणि स्लीप सायकल सुधारण्यात देखील मदत करतात.
इतर काही महत्त्वपूर्ण टिप्स -
निरोगी आरोग्यासाठी सकस आहाराची काळजी घेण्याव्यतिरिक्त, खालील काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे:
- झोपण्याअगोदर मोबाईल अथवा लॅपटॉप वापरणे टाळा.
- झोपण्यापूर्वी कॅफिन असलेले खाद्यपदार्थ किंवा पेय टाळा.
- विशेषत: झोपेच्या अगोदर धूम्रपान करणे टाळा.
- जास्त जड, मसालेदार आणि खूप साखरयुक्त पदार्थ खाऊ नका.
- स्वत: ला हायड्रेटेड ठेवा.
- नियमित व्यायाम करा.
- जेवण आणि झोपेच्या मध्ये किमान २ ते ३ तासांचे अंतर असणे गरजेचे आहे.
- आपले मन शांत आणि चिंतामुक्त ठेवण्यासाठी ध्यान करा.
- दिवसा झोपणे टाळा. १५ ते २० मिनिटांची कमी कालावधीची झोप घेऊ शकता.
निरोगी शरीर आणि शांत मन चांगली झोप येण्यास मदत करतात. शिवाय झोपेची गुणवत्ता वाढवण्यास आणि स्लीप सायकल सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे मध्यरात्री निद्रानाश सारख्या समस्यांपासून वाचण्यासाठी सकस आहाराची सवय आणि योग्य जीवनशैली ठेवणे गरजेचे आहे.