हैदराबाद - कोरोना विषाणू संपूर्ण जगाला विळखा घालत असताना तातडीने मानसिक आरोग्याच्या सेवांमध्ये गुंतवणूक वाढविणे गरजेचे असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने मानसिक आरोग्याविषयक जाहीर केलेल्या पॉलिसीमध्ये म्हटले आहे. अन्यथा येत्या काही महिन्यांत मानसिक आरोग्याच्या समस्येत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
कोरोना महामारीचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर होणारा दुष्परिणाम अत्यंत चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक डॉ. टेड्रॉस अॅडहॅनाॅम घेब्रेयसस यांनी म्हटले आहे.
सामाजिक अलिप्तपणा संसर्ग होण्याची भीती आणि कुटुंबातील सदस्यांची प्राणहानी यामध्ये नोकरी गमावण्याचे दुःख आणि परिणामी उत्पन्नावर होणारा परिणाम यांची भर पडल्याने लोकांच्या त्रासात वाढ झाली असल्याचे टेड्रॉस म्हणाले.
बर्याच देशांमधून नैराश्य आणि चिंताग्रस्त लोकांची संख्या वाढत असल्याचे आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेषतः आरोग्य सेवा देण्यात अग्रस्थानी असलेले कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. कामाचा वाढत ताण, सतत जीवन-मृत्यू या पातळीवर निर्णय घेण्याची वेळ, संसर्ग होण्याची भीती यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे.
लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना देखील याचा धोका आहे. जोखीम असलेल्या गटामध्ये स्त्रिया आघाडीवर आहेत. विशेषत: घरातील काम सांभाळून वर्क फ्रॉम होम किंवा घरातून कार्यालयीन काम पार पाडण्याबरोबरच मुलांचा अभ्यास घेणे यांसारख्या अनेक गोष्टींमुळे महिलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय वयस्क व्यक्ती आणि अगोदरच मानसिक आजाराची समस्या असलेल्या लोकांना देखील मोठा धोका संभवतो.
मानसिक आरोग्य सुविधा केंद्रांचे रूपांतर कोविड १९च्या उपचार केंद्रांमध्ये झाले असल्याने आणि या विभागातील कर्मचाऱ्यांचा कोविड रुग्णांशी संपर्क येऊन ते बाधित झाले असल्याने मानसिक आरोग्य सेवा पुरविणारी यंत्रणा प्रभावित झाली आहे.
मानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठीच्या सुविधांना देखील कोविड १९पासून बचाव करण्यासाठीचा अत्यावश्यक भाग म्हणून समावेश करणे गरजेचे असल्याचे घेब्रेयसस यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, "युनायटेड नेशन्सच्या पाठिंब्याने सरकारे आणि नागरी समाजाची ही एकत्रित जबाबदारी आहे. लोकांच्या भावनिक हिताला गांभीर्याने न घेतल्यास त्याची सामाजिक आणि आर्थिक पातळीवर दीर्घकाळासाठी मोठी किंमत मोजावी लागेल."
मात्र, काही देशांनी मानसिक आरोग्य सेवा आणि मानसशास्त्रीय पाठिंब्याच्या दृष्टीकोनात बदल केल्यामुळे त्यात यश मिळत असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
सामाजिक ऐक्य वाढविणाऱ्या आणि एकटेपणा कमी करणार्या कृतींना आत्मसात करून विशेषतः वृद्ध आणि ज्या लोकांना याचा अधिक धोका संभवतो त्यांना सामावून घेणे सुरूच ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकट्याने राहणाऱ्या लोकांना खाद्यपदार्थांचा पुरवठा करणे, या लोकांशी नियमितपणे फोनवरून बोलणे तसेच या लोकांसाठी बौद्धिक पातळीवर चालना देणाऱ्या कृतींचे आयोजन करणाऱ्या संस्थांना शक्य त्या सर्व पातळीवर सहाय्य करणे हे सरकार आणि स्थानिक प्रशासनासाठी काळाची गरज बनली आहे.