यवतमाळ - पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील १२४ पेक्षा जास्त गावांना पुराचा जबर फटका बसला आहे. महापुरामुळे उद्धवस्त झालेल्या गावांपैकी एक गाव दत्तक घेऊन ते उभे करण्याचा संकल्प यवतमाळ आपत्कालीन समितीने केला आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या बाबींची पूर्तता केल्यानंतर समिती त्या भागात जाणार असल्याची माहिती यवतमाळ आपत्कालीन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सांगली जिल्ह्यांतील पूरप्रभावित भागातील नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांना मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, यानंतरही अनेकांना मदतीची गरज आहे. यवतमाळ आपत्कालीन समितीने उद्धवस्त झालेल्या गावांपैकी एक गाव संपूर्णपणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या गावातील नागरिकांना लागणारी सर्व मदत करण्याचा निर्धार समितीने केला. घरातील साहित्य, छोटे व्यावसायिक, तसेच नागरिकांना आधार देण्यासाठी जी मदत करता येईल ती सर्व मदत समिती करणार आहे.
गावात श्रमदानापासून गाव उभारणीचे काम समितीमधील पदाधिकारी करणार आहेत. समितीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेऊन गावाबाबतची माहिती घेतली. कोल्हापूर येथून प्रशासनाकडून माहिती येताच समितीचे सदस्य त्या भागात रवाना होणार आहेत. या कार्यात जिल्हावासीयांनी सहभागी होत मदत द्यावी, असे आवाहन समितीने केले आहे. अन्नधान्यापासून किराणा, ताटवाटी, अशा सर्व स्वरूपात मदत समिती स्वीकारणार आहे. यासाठी गुप्ता कॉम्प्लेक्स, यवतमाळ अर्बन बँकेचे मुख्य कार्यालय, बजाज मेडिकल, प्रतिसाद फाउंडेशन, संकल्प फाउंडेशन संकलन येथे मदत स्वीकारली जाणार असल्याची माहिती यवतमाळ आपत्कालीन समितीतर्फे देण्यात आली.