यवतमाळ - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळाने ऑनलाइन जाहीर केला. यात मुलींनीच बाजी मारली असून, जिल्ह्याचा निकाल ६६.२० टक्के लागला आहे. पुसद तालुका टक्केवारीत अव्वल आहे. तर, मारेगाव तालुक्याचा क्रमांक ढँग लागला आहे.
लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचा विद्यार्थी तनय संजय वानखडे ९९.२० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आला आहे. नीरज सतीश पाथरटकर याला ९८ टक्के गुण मिळाले. दहावीच्या निकालाची उत्सुकता कमालीची शिगेला पोहचली होती. दरवर्षीच्या प्रमाणात निकालाची टक्केवारी कमी असल्याचे चित्र पुढे आले. जिल्ह्यातील ६२७ शाळांमधून ३९ हजार १०९ नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी करण्यात आली. त्यात २० हजार १५३ विद्यार्थी, १८ हजार १७२ विद्यार्थिनी, असा एकूण ३८ हजार ३२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
१२ हजार १३१ विद्यार्थी व १३ हजार २४० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या निकालाची टक्केवारी ६०.१९ तर मुलींची टक्केवारी ७२.६६ आहे. तीन हजार ७९४ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवित घवघवीत यश संपादन केले. ९ हजार ४०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १० हजार १५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ हजार १०१ विद्यार्थी केवळ पास झाले आहेत.
तनयला व्हायचयं डॉक्टर
तनय वानखडे मुळचा घाटंजी तालुक्यातील शिरोली येथील आहे. शिक्षणासाठी सुरुवातीपासून तो यवतमाळ येथे आहे. वडील शेतकरी असून घरच्यांची परिस्थिती जेमतेम, असे असतानाही अभ्यास करून तनयने भरारी घेतली. त्याला ९९.२० टक्के गुण मिळाले आहे. पुढचे शिक्षण नागपूर येथे करण्याची ईच्छा असून वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर घडवून डॉक्टर होण्याची तनयची ईच्छा आहे.
कुस्तिपटू चेतनची भरारी
समाजकल्याण वसतिगृहात राहून कुस्ती सोबत शिक्षणातही चेतनने भरारी घेतली. चेतन अरविंद ठाकरे या राळेगाव तालुक्यातील लोहारा येथील विद्यार्थ्यांने शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे. चेतनचे आई-वडील आणि लहान बहिण गावीच राहतात. वडील शेती तर आई मजुरी करते. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी चेतनला यवतमाळ येथे लोकनायक बापूजी अणे विद्यालयात प्रवेश करून दिला. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने वसतिगृहात वास्तव्य केले. खेळ, शिक्षण असा दोन्ही क्षेत्रात चेतनने आपली छाप सोडली असून दहावीच्या परीक्षेत त्याला ९०.२० टक्के गुण मिळाले आहे. त्याला पुढील शिक्षण यवतमाळ येथेच पूर्ण करायचे आहे.
तालुकानिहाय निकाल (टक्के)
यवतमाळ- 69.05
नेरपरसोपंत- 73.11
दारव्हा- 64.13
दिग्रस- 71.35
आर्णी- 60.38
पुसद- 75.27
उमरखेड- 61.85
महागाव- 72.43
बाभूळगाव- 67.51
कळंब- 59.02
राळेगाव- 61.35
मारेगाव- 53.54
पांढरकवडा- 61.44
झरीजामणी- 54.64
वणी- 63.78
घाटंजी- 59.12