यवतमाळ - जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हातात नाही. तरीही योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.
खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करुन देण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी विभाग हा गावस्तरावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहचणारा घटक आहे. शेतकऱ्यांना हंगामात बियाणे आणि खतांची कमतरता जाणवणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेशही देण्यात आले आहे.
खरीप हंगामाकरिता ९ लाख १० हजार ५०५ हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. यात सोयाबीन २ लाख ७७ हजार ८४२ हेक्टरवर, कापूस ४ लाख ५८ हजार ८५६ हेक्टर, तूर १ लाख ३१ हजार १९१ हेक्टर, ज्वारी १५ हजार ८७५ हेक्टर, उडीद ७ हजार ३४ हेक्टर, मूग ८ हजार ६६८ हेक्टर, मका २२० हेक्टर आणि इतर पिके १० हजार ८१९ हेक्टर यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सोयाबीन बियाणांची मागणी १ लाख ५६ हजार २८६ क्विंटल असून आतापर्यंत ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तर, कपाशीच्या २५ लाख ४४ हजार १११ पॅकेटची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एकूण खतांची मागणी १ लाख ९० हजार ७०७ मेट्रिक टन असून यापैकी १ लाख ३३ हजार ८४६ मेट्रिक टन खतांची उपलब्धता झाली आहे. यात युरिया, एमओपी, एसएसपी, कॉम्प्लेक्स, एनपीकेएस या खतांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.