यवतमाळ - मागील 24 तासांत जिल्ह्यात 52 जण नव्याने पॉझिटिव्ह आढळले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 46 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
मृतांमध्ये यवतमाळ शहरातील 78 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार 28 ऑक्टोबर रोजी एकूण 413 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नवे पॉझिटिव्ह तर 361 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 404 ॲक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 हजार 33 झाली आहे.
एकूण बरे झालेल्यांची संख्या 8 हजार 922 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 344 मृत्यूची नोंद आहे. यात 25 मृत्यू हे 5 सप्टेंबर 2020 ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीतील खासगी रुग्णालयात झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने सांगितले. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत 89 हजार 900 नमुने पाठवले असून यापैकी 89 हजार 538 प्राप्त तर 362 नमुने अद्याप येणार आहेत.