यवतमाळ - दहा रुपयाच्या नाण्यावर कोणतीही बंदी आली नसून हे नाणे चलनात कायम आहे. ग्राहक, व्यापारी हे नाणे घेत नसल्याने सद्या जिल्ह्यात वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. हे दहा रुपयांचे नाणे इतक्या प्रमाणात जमा झाले आहे की, एसबीआईची तिजोरी पूर्णपणे भरलेली आहे. त्यामुळे इतर बँकाची आणि एसबीआयची रोकड ठेवण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. या बाबत यवतमाळ जिल्ह्यातील जनतेने दहा रुपयाच्या नाण्याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये. सामान्य नागरिकांसह, व्यापारी व दुकानदारांनी ही नाणी ग्राहकांकडून बिनधास्त स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार दहा रुपयाचे नाणे चलन म्हणून सुरू आहे. मात्र,यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांमध्ये याबाबत गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे ही नाणी व्यवहारात स्वीकारली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी ही नाणी बँकेत मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बँकामध्ये इतर चलनी नोटा ठेवण्यास जागेची अडचण येत आहे. ही अडचण केवळ यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक पुरुषोत्तम बहिरसेठ यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यातील व्यापारी आस्थापना, किरकोळ दुकानदार, ठोक व चिल्लर आस्थापना यांनी दहा रुपयाचे नाणे स्वीकारावे. नागरिकांनीसुध्दा अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.