यवतमाळ - कुठे उंचच उंच ज्वारी, तर कुठे हरभरा. कोबी, टमाटर, मका, काकडी, दोडके, कारली, वांगी, मेथी, कोथिंबीर या भाज्यांनी हिरवागार झालेला परिसर. हे कुठले शेत नव्हे तर, हा आहे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचा 'शाल्मली' हा शासकीय बंगला. गुल्हाने यांनी या निवासस्थानाचा संपूर्ण ६ एकर परिसराचा कानाकोपरा शेतात राबून स्वत: फुलवला आहे.
या परिसरात संत्रा, आंबा, फणस, चिकू, आवळ्यासह औषधी वनस्पती सहज नजरेस पडतात. वर्षभरापूर्वी यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाने यांनी पदभार स्वीकारला. उद्यानविज्ञान विषयात एमएस्सी असल्याने त्यांना शेतीची भारी आवड होती. जेव्हा ते या शासकीय बंगल्यात आले होते, तेव्हा हा संपूर्ण परिसर ओसाड पडला होता. योग्य नियोजन करून गेल्या वर्षभरात त्यांनी या संपूर्ण परिसराचा कायापालट केला. त्यांना हा परिसर ग्रीन फेज म्हणून विकसित करायचा आहे. येत्या काळात तुती आणि रेशीम शेती करण्याचाही त्यांचा मानस आहे. याठिकाणी एकत्र झालेल्या कचऱ्यातून कंपोस्ट खत, गांडूळ खत तयार केले जाते. यातूनच सेंद्रीय पद्धतीने येथे भाजीपाला आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. या उत्पादनातून मिळालेले उत्पन्न वृद्धाश्रमाला देण्याचा त्यांचा मानस आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी हे 'वाटाघाटीत कठोर' असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले; यामागचा नेमका अर्थ काय?
जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीला कामाचा ताण असतो. मोठ्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. हा तणाव दूर करण्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गुल्हाने आपल्या या फुलवलेल्या रानात येतात. या सर्व हिरव्या सवंगड्यांचा ताणतणाव घालवण्यासाठी खूप फायदा होता, असे ते सांगतात.