यवतमाळ - शहरातील निर्माणाधीन इमारतीच्या 10 व्या मजलावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गवळीपुरा भागात घडली. संजू सरदार कालीवाले असे मृत मजुराचे नाव आहे.
गवळीपुरा येथे दहा मजली इमारतीच्या स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, अचानक दहाव्या मजल्यावरील दोरी तुटल्याने त्याचा तोल जाऊन संजय हा दहाव्या मजल्यावरून खाली कोसळला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी व मजुरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळावरील नागरिकांनी व मजुरांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील चौकशीअंती बिल्डरवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.