यवतमाळ - जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून शेतातील खासगी विहिरीचे पाणी भरतात. आता या शेताची विक्री झाल्याने नवीन मालकाने पाणी भरण्यास मनाई करत वहिवाट रस्ता बंद केला. त्यामुळे पाण्याच प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे महिलांनी मारेगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत चार तास ठिय्या आंदोलन केले.
पुरुषोत्तम कोमरेडीवार यांच्या शेतात ही विहीर आहे. ग्रामस्थ शेतातील विहिरीतून पाणी भरत होते. सदर शेत वणी येथील व्यक्तीने विकत घेतले. ग्रामस्थांना पाणी भरण्यास त्या व्यक्तीने मनाई करून विहिरीकडे जाणारा रस्ता बंद केला. तसेच शिवीगाळही केली. त्यामुळे महिलांनी पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे या प्रश्नाकडे प्रशासन किती गांभीर्याने बघेल हे पाहणे महत्वाचे असेल.