यवतमाळ - पांढरकवडा तालुक्यातील पेंढरी शेतशिवारातील एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढल्याची घटना 11 एप्रिलरोजी उघडीस आली होती. याप्रकरणी सोमवारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा राम शेडमाके (२८) रा.कारेगाव, बंडल, असे मृत महिलेचे नाव आहे.
आत्महत्या नसून हत्याच -
महिला मुळ पेंढरी येथील असून तिचा विवाह कारेगाव (बंडल) येथील राम शेडमाके यांच्या सोबत झाला होता. काही दिवसाआधी रेखा शेडमाके आपल्या माहेरी पेंढरी येथे आली होती. रविवार ११ एप्रिल रोजी पेंढरी येथील कवडू करपते यांच्या शेतातील विहिरीत रेखा शेडमाके हीचे प्रेत तरंगत असल्याची माहिती गावकऱ्यांनी पांढरकवडा पोलीसांना दिली. या प्रकरणाचा पोलीसांनी तपास केला असता, महिलेच्या डाव्या हाताला एक चिठ्ठी तसेच एक सिमकार्ड बांधलेले आढळून आले होते. शवविच्छेदन केल्यानंतर महिलेला गळा आवळून मारल्यानंतर पाण्यात टाकले असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. या माहितीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- रेमडेसिवीरमुळे कोरोना मरत नाही - अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर