यवतमाळ - आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथे विना परवानगी व कोरोना नियमांना धाब्यावर बसवून सुरु असलेल्या लग्न समारंभावर आर्णी पोलिसांनी कारवाई केली आहे. वधूच्या नातेवाईकांवर आर्णी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. महाळुंगी येथील कैलास भिकुसिंग राठोड यांच्या मुलीचे लग्न तालुक्यातील बोरगाव येथील शिवलाल भावसिंग चव्हाण यांच्या मुलासोबत ठरले आहे. मात्र, कोरोना नियमांना धाब्यावर बसवून वधूच्या राहत्या घरी महाळुंगी येथे लग्न केले.
लग्नाची माहिती आर्णी पोलिसांना मिळताच, पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार सुरेश शिंदे, संदीप चरडे, एएसआय मनोहर पवार, सतिश चौदार यांनी लग्नाच्या ठिकाणी पोहोचले. वराचे वडिल शिवलाल भावसिंग चव्हाण (रा. बोरगाव) व वधूचे वडिल कैलास भिकुसिंग राठोड (रा. महाळुंगी) यांच्यावर साथ रोग नियंत्रण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. याआधी ही आर्णी पोलिसांनी तालुक्यातील शीरपूर येथील एक, उमरी इजारा येथील दोन तर पाभळ येथील एका लग्न समारंभावर कारवाई केली. वधूंच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केला असून, दंडही आकारण्यात आला.