यवतमाळ : कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून राज्यभरात दंड वसूल केला जात आहे. यवतमाळमध्ये गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या यासंदर्भातील कारवाईत सुमारे सव्वादोन कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र नागरिकांकडून याचे उल्लंघन होताना दिसत आहे. परिणामी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि प्रादेशिक परिवहन कार्यलयाने कारवाईचा बडगा उगारला. मास्क न वापरणे, दुचाकीसंदर्भातील नियमांचा भंग करणे, सामाजिक अंतर न आखणे, दुकान व हॉटेलमध्ये गर्दी करणे अशा नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत गेल्या वर्षभरात सुमारे दोन कोटी 25 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महसूल पथकाकडून तपासणी
जिल्ह्यातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. अशा भागातील बाजारपेठा, उपहारगृहे या ठिकाणी तपासणी करण्यासाठी तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत. तहसीलदारांकडून हॉटेल आणि उपहागृह तपासणीचे काम मागील महिनाभरापासून सुरू करण्यात आले आहे. तसेच मंगल कार्यालय, प्ले ग्राउंड, सार्वजनिक ठिकाणीही अचानक धाडी टाकण्यात येत आहे. यातून दिवसाला किमान 75 हजारांचा दंड वसूल करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.