यवतमाळ- विदर्भातील जनतेचे वीजबिल निम्मे करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे. अशी मागणी करत जिल्ह्यातील विदर्भ राज्य आंदोलन समितीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली. यावेळी वीज दरवाढीचा निषेध करत त्यांनी ठिय्या आंदोलनही केली.
विदर्भामध्ये कोळसा आधारीत वीज औष्णिक केंद्र आहेत. त्यासाठी विदर्भाची जमीन गेली, पाणी गेले, कोळसा लागला. प्रदूषणही विदर्भात झाले. प्रदूषणामुळे वेगवेगळ्या आजाराने नागरिक त्रस्त झाले. इतके सारे असूनही देशात सर्वात महागडी वीज महाराष्ट्रात मिळते. मीटर भाडे, वीज वहन कर, भार, अधिभार यामुळे वीज ग्राहक लुटले जात आहेत. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून आंदोलन करण्यात आले.
वीज बिलाच्या मागील बाजूस असलेले वीज वहन कर, सर्व प्रकारचे भार, अधिभार हटविण्यात यावे, विदर्भातील सर्व जनतेचे वीज बिलाचे दर निम्मे करण्यात यावे, शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, लोडशेडिंग बंद करण्यात यावे. या मागणीसाठी अधीक्षक अभियंता चितळे यांना निवेदन देऊन वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी विदर्भराज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.