यवतमाळ - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यवतमाळ येथील तिरंगा चौक आणि वणी उपविभागीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. 2019 च्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदान आणि मतमोजणीच्या संख्येत फरक असल्याचे समोर आले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून खुलासा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात. या मागणीसाठी ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाव’ हे राज्यस्तरीय आंदोलन वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन घेण्यात आले.
मतदानासाठी वापरण्यात येणाऱया ईव्हीएम मशिनबाबत अनेक घोळ समोर आले आहेत. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 350 मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या संख्येत तफावत आढळून आली आहे. या आकडेवारीमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत आठ दिवसात सविस्तर खुलासा करावा व येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम मशीनचे प्रतिकात्मक दहन करून ईव्हीएम मशीनचा निषेध करण्यात आले. या आंदोलना नंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.