यवतमाळ- दिग्रस येथील अरुणावती धरणाचा मोठ्या प्रकल्पांमध्ये समावेश होतो. या धरणात मासेमारीही मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, धरणात अवैध मासेमारी करणाऱ्यांकडून मासेमारीसाठी विष प्रयोग केला जात असल्याची तक्रार मासेमारी करणाऱ्या अधिकृत ठेकेदाराने दिली आहे.
ब्रिज फिशरीज या कंपनीला अरुणावती धरणात मासेमारी करण्याचा कंत्राट मिळाले आहे. त्यांच्या यंत्रणेकडून धरणातून मासेमारी केली जाते, तर धरणांमध्ये अवैध मासेमारी करणाऱ्या व्यक्तींचाही शिरकाव झाला असून, या अवैध मासेमारी करणाऱ्यांकडून धरणामध्ये मासे पकडण्याकरीता विषप्रयोग केला जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ही बाब अधिकृत कंत्राटदाराला लक्षात आल्यानंतर त्याने अरुणावती पाटबंधारे विभाग आणि दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. याबाबत अरुणावती प्रकल्पाकडूनही पोलीस ठाण्याला सूचना देण्यात आली असून, या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे.
धरणात विष प्रयोग होत असल्याचे कळताच स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे या धरणातून अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. वाशिम जिल्ह्यासही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
या विष प्रयोगाप्रकरणी अरुणावती पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता के. आकुलवार यांच्याशी विचारणा केली असता, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर कोणत्याही गावाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला नाही, असेही त्यांनी सांगितले. प्रशासनाने या बाबतीत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे.