यवतमाळ - दिग्रस तालुक्यातील भिलवाडी पासून 4 किलोमीटर अंतरावरील टेकडीवर असलेल्या महादुबूवा मंदिराच्या ओट्याच्या परिसरात एका 36 वर्षीय अज्ञात महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात महिलेची निर्घृणपणे हत्या करून तीचे शीर कापून मृतदेह खोल दरीत फेकून दिला आहे.
हेही वाचा - पुण्यात सराईत गुन्हेगाराची डोक्यात फरशी घालून हत्या
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी महादुबूवा मंदिराच्या ओट्यावर रक्ताचे डाग, ३ दात, टाचणी, कानातील डुल आणि हिरव्या रंगाचा बांगडयांचा चुराडा घटनास्थळी पोलिसांना आढळून आला. तसेच मंदिराच्या ओट्यामागील खोल दरीमध्ये अज्ञात महिलेचा निर्वस्त्र अवस्थेतील शीर नसलेला मृतदेह पोलिसांना सापडला. या मृतदेहाच्या उजव्या हातावर गोंदलेल्या ठिकाणावरील मांस अज्ञात आरोपीने काढून पुरावा नष्ट केल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यावरून पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने हत्या झालेल्या अज्ञात महिलेच्या शिराची आणि इतर वस्तुंचा तपास घटनास्थळी घेतला. परंतू, त्याठिकाणी मृतदेहाचे शीर न सापडल्याने मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.
हेही वाचा - साताऱ्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण, पोलिसांच्या दक्षतेने तीन आरोपी गजाआड
ही हत्या अनैतिक संबंधातून झाली, की अंधश्रद्धेमुळे याची उलट सुलट चर्चा परिसरात सुरू आहे. हत्या करून अज्ञात आरोपीने धडापासून शीर वेगळे का केले? आणि देवाच्या ओट्यावरच हत्या का केली? याबाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, पुसद सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुराग जैन, पुसद ग्रामीण वसंतनगर पोलीस निरीक्षक चोबे, पुसद पोलीस निरीक्षक परदेशी, दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांनी पाहणी केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.