यवतमाळ - कोरोनाच्या संकट काळात यवतमाळ जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या 200 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मागील नऊ महिन्यांपासून कुठलीही तमा न बाळगता कोरोना वॉर्डात रुग्णाची सेवा करत त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी आणि सेवा दिली असताना शासनाच्या आरोग्य विभागाने आमचे कुठेतरी समायोजन केले पाहिजे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कोरोनाचे थैमान असताना या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने एनएचएमच्या हेड खाली तीन महिन्याचे नियुक्ती पत्र देऊन आरोग्य सेवकांची भरती केली. या आरोग्य सेवकांनी संधीचे सोने करत कोविड सेंटरला काम केले. कोरोनाबाधीत रुग्णांची देखभाल केली. मात्र, शासनाचे या कोरोना योध्यांना शाबासकी न देता बेरोजगारीचे बक्षीस दिले आहे. आम्हला आरोग्य विभागात कंत्राटी स्थरावर कुठे तरी सामावून घ्यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
शासनाकडून सेवा थांबविण्याचे आदेश -
नऊ महिन्यांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेवकाच्या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांच्याशी संपर्क साधला असता या कंत्राटी आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांची सेवा थांबविण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरूनच आले असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - रत्नागिरी : सेल्फी काढताना हेदवीच्या बामणघळीत पडून जोडप्याचा मृत्यू