यवतमाळ- वणी वेकोली क्षेत्रानंतर्गत कुंभारखणी येथे भूमिगत कोळसा खाण आहे. या खाणीत अचानक गॅस लीक झाला. या दरम्यान कामावर रुजू होण्यास गेलेला मामा आणि त्याच्या सोबत असलेला भाचा गुदमरून ठार झाला. तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली.
गुड्डू रामेश्वर सिंग तसेच राजकुमार महेंद्र सिंग असे मृतांचे नाव आहे. घटनास्थळी मृत गुड्डू सिंग हे गुरुवारी कामावर रुजू होण्यास गेले. त्यावेळी त्यांचा भाचा राजकुमार सिंग हा खदान बघण्यासाठी गेला होता. अचानक खाणीत गॅस लीक झाला. त्यावेळी खान बंद करण्याचे काम करीत असलेले बंडू ठेंगणे व महादेव तेलंग हे त्यांना वाचविण्यासाठी गेले. त्यावेळी लीक झालेला गॅस त्यांच्या नाका तोंडात गेल्याने ते जखमी झाले. त्यांना ताबडतोब उपचारार्थ वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर वेकोलीच्या चमुनीं खाणीत असलेले दोनही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले आहे.
कुंभरखणी भूमिगत कोळसा खाण सन 2000 मध्ये सुरू करण्यात आली होती. यातील कोळसा संपल्याने वेकोली प्रशासनाने मागील वर्षी पासून ही खाण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खाण बंद करण्याचे काम सुरू आहे.