यवतमाळ - गत दोन दिवसात जिल्ह्यात कारोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही. त्यातच सुरवातीला पॉझिटिव्ह असलेले दोन जण 14 दिवसांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येईल. जिल्ह्यात सद्यस्थितीत 15 अॅक्टीव्ह रुग्णांसह एकूण 21 जण आयसोलेशन वॉर्डात भरती आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 113 वर गेला असून यापैकी तब्बल 98 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यातच जिल्ह्यात कोव्हिडमुळे एकही मृत्यू झाला नाही. ही जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक बाब आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी 25 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. आतापर्यंत महाविद्यालयाने एकूण 1938 नमुने तपासणीसाठी पाठविले असून यापैकी 1914 रिपोर्ट प्राप्त तर 24 रिपोर्ट अप्राप्त आहेत. आतापर्यंत निगेटिव्ह असलेल्या रिपोर्टची संख्या 1801 आहे. संस्थात्मक विलगीकरणात 13 जण तर गृह विलगीकरणात एकूण 494 जण आहेत. जिल्ह्यातील विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 16 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट सोमवारी सकाळी वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले.
यवतमाळ येथील पाच, दिग्रस येथील एक, दारव्हा येथील तीन, आर्णी एक, घाटंजी एक, पुसद दोन, कळंब एक, माहूर एक आणि छत्तीसगड येथील एका रिपोर्टचा समावेश आहे, असे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
यवतमाळ शहरात एकच प्रतिबंधित क्षेत्र
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर यवतमाळ शहरातील पाटीपुरा (डोर्लीपुरा) भागात प्रशासनाने लावलेले प्रतिबंध सोमवार 25 मे रोजी सकाळी 6 वाजतापासून पूर्णपणे काढण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरात केवळ एक म्हणजे इंदिरा नगर (पवार पुरा) हेच क्षेत्र प्रतिबंधित म्हणून कायम राहणार आहे.