यवतमाळ - यवतमाळ विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी यांचे नाव निश्चित झाले आहे, तर भाजपकडून किशोर कन्हेरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
हेही वाचा - यवतमाळ जिल्हा परिषदेवर 'महाविकास आघाडी'चा झेंडा
याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे यांची बैठक घेतली. त्यानुसार तीन संभाव्य उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले होते. यातील एक नाव उद्धव ठाकरे यांनी निश्चित केले. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय दुष्यंत चतुर्वेदी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यांच्या उमेदवारीमुळे पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेला बळ मिळेल, असे बोलले जात आहे.
हेही वाचा - बावीस घरफोडीतील अट्टल चोरट्यास अटक; दागिन्यांसह साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये याआधी तानाजी सावंत यांना उमेदवारी दिली. मात्र, तानाजी सावंत हे निवडून आल्यानंतर एकदाही यवतमाळला फिरकले नाही. त्यामुळे यावेळी पुन्हा बाहेरचा उमेदवार नको अशी मागणी होत आहे. तर भाजपकडून नागपूरच्या किशोर कन्हेरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. किशोर कन्हेरे हे शिवसेनेचे नागपूर जिल्ह्यातील नेते आहे. नुकतेच माजी पालकमंत्री आमदार मदन येरावार यांनी बैठक घेऊन किशोर कन्हेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा - खाते मिळण्यापेक्षा मी कॅबिनेट मंत्री आहे हे महत्त्वाचे - संजय राठोड
किशोर कन्हेरेंनी भाजपकडून उमेदवारी दाखल केल्यास याचा सेनेला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडे 145 मतदार तर महाविकास आघाडीकडे 300 मतदार आहे. तर 45 अपक्ष मतदार आहे. त्यामुळे यवतमाळ विधान परिषदेवर सध्या महाविकास आघाडीची मजबूत पकड असल्याचे दिसून येते.