यवतमाळ- महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात असलेल्या चिल्ली शिवारातील शेतात दाम्पत्यावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. याघटनेत पती जागीच ठार झाला असून पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. विलास भुमा राठोड (५०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या पत्नी ललिताबाई भुमा राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा-जिल्ह्यात 202 नवीन कोरोना 'पॉझिटिव्ह' रुग्णांची भर; आठ रुग्णांचा मृत्यू
विलास भुमा राठोड हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या नावावर २ एकर शेती आहे. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. राठोड दाम्पत्य शेतात निंदण करत असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. या घटनेत विलास राठोड यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी ललिताबाई बेशुद्ध पडल्या.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी घटनेबाबत नैसर्गिक आपत्ती विभागाला दूरध्वनीवरून माहिती दिली. महसूल विभागाने पंचनामा केला. ललिताबाई यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राठोड कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.